अंबरनाथ : पूर्वी भाऊबंदकी हे नाटक गाजले होते मात्र आता राज्यात मनोमिलन नाटक सुरू आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटींवर जोरदार टीकास्त्र सोडले. अंबरनाथ शहरातील बहुप्रतिक्षित नाट्यगृहाचे लोकार्पण रविवारी संपन्न झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी नाट्य कलावंताच्या उपस्थितीत विरोधकांना कोपरखळ्या दिल्या.

अशोक सराफ यांचे सारख छातीत दुखतंय हे नाटक प्रसिद्ध होते. पण आमचे काम पाहून विरोधकांच्या पोटात पण दुखतंय, असाही टोला एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला. सर्व कलाकारांनी किमान एक नाटक इथे करावे, असे आवाहन यावेळी शिंदे यांनी उपस्थित कलावंतांना केले.

अंबरनाथ शहरातील बहुप्रतिक्षित नाट्यगृहाचे रविवारी दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण संपन्न झाले. यावेळी नाट्य, सिने क्षेत्रातील नामवंत कलाकारांनी हजेरी लावली होती. या नाट्यगृहाला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात आले. तर यातील रंगमंचाला नाटककार बाळ कोल्हटकर यांचे नाव देण्यात आले. यावेळी नाट्यगृहाच्या परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.

विकासाच्या कामात सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले पाहिजेत. हे दोघे एकच रथाची चाके आहेत. आजचा दिवस अंबरनाथकरांसाठी ऐतिहासिक आहे, असे प्रतिपादन यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कलावंत अडचणीत असताना प्रत्येक वेळी आनंद दिघे यांनी त्यांच्यासाठी मागे उभे राहण्याचे काम केले. त्यामुळे त्यांचे नावे नाट्यगृहाला देणे ही त्यांना आदरांजली असल्याचे मतही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. काही लोक कायमच रडत असतात, रडगाण गात असतात. इथे नाट्यगृहात क्राय रूम आहे, ते विरोधकांना कामा येईल. पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजलं होत. आता मनोमिलन नाटक सुरू आहे, असा टोला शिंदे यांनी ठाकरे बांधून लगावला.

अंबरनाथचे नाट्यमंदिर हे दुसरे शिव मंदिर आहे असे मी मानतो. त्यामुळे त्याची स्वच्छता राखा ते कसे चांगले राहील याची सर्वांनी काळजी घ्या, असे आवाहन यावेळी अशोक सराफ यांनी केले. अंबरनाथकर नशिबवान आहेत की त्यांना इतके सुंदर नाट्यगृह मिळाले. मी नक्कीच नाटकासाठी इथे येईल. तुम्ही नाट्यकलेला प्रोत्साहन द्या. कलाकारांच्या मागे उभे रहा, अशा भावना अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या.

याप्रसंगी अशोक सराफ, महेश कोठारे, उषा नाडकर्णी, अलका कुबल, मकरंद अनासपुरे, विजय पाटकर, विजय गोखले, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, संतोष जुवेकर, अशोक पत्की, अशोक समेळ, मंगेश देसाई, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, बालाजी किणीकर, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, माजी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, यांच्यासह नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.