ठाणे : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दोन उपनगरीय रेल्वेगाड्यांमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात मध्य रेल्वेच्या अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती योग्य पद्धतीने केली नसल्याने ही दुर्घटना झाल्याचे अहवालात नमूद झाले आहे. त्यामुळे निष्पाप प्रवाशांचा मध्य रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि साहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्यासह इतरांविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दुर्घटना घडली होती. येथील वळण मार्गावर कसारा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाच्या दिशेने वाहतुक करणारी आणि सीएसएमटी येथून कर्जतच्या दिशेने वाहतुक करणारी रेल्वेगाडी एकाचवेळी आल्यानंतर हा अपघात झाला. या घटनेत एकूण आठ प्रवासी रेल्वे रुळांवर पडले. तर सहा प्रवासी रेल्वेगाडीच्या डब्यात पडून जखमी झाले. रेल्वे रुळांवर पडलेल्या प्रवाशांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही सामावेश होता.

या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. तसेच मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील धोकादायक तीव्र वळणाविषयी देखील चर्चा सुरु झाली होती. याप्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरु होती. रेल्वेने एक अहवाल तयार केला होता. अपघात प्रवाशाच्या बॅगेमुळे झाल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगत होते. याप्रकरणात गुन्हा दाखल नव्हता. रविवारी याप्रकरणी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता आणि साहाय्यक विभागीय अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अहवालात काय आहे

– १४ ऑक्टोबरला पोलिसांना मुंब्रा अपघाताप्रकरणी अहवाल मिळाला आहे. या अहवालाच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला. यामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्याने मुंब्रा रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी भरले होते. रेल्वे रुळांखालील खडी निघाली होती. तसेच जमीन आणि फलाट क्रमांक चार देखील खचला होता. याची माहिती अभियंत्यांना मिळाल्यानंतरही त्यांनी तेथील देखभाल दुरुस्ती केली नव्हती. तसेच ६ जूनला मुंब्रा रेल्वे स्थानकाबाहेरील नाला तुंबला होता. त्याचे पाणी फलाट क्रमांक तीन आणि चारमधील रेल्वे रुळांवर साचले होते. त्यामुळे वेग मर्यादा निश्चित केली होती होती. तो वेग कमी करणे आवश्यक होते.

– दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान वळणाजवळ रेल्वेगाड्या घासल्याने हिसके लागत होते. ५ जूनला मध्यरात्री रेल्वे रुळ बदलण्यात आले. ज्या ठिकाणी रेल्वे रुळ बदलले तेथे जोडणी (वेल्डिंग) करुन रुळ व्यवस्थित करणे आवश्यक होते. परंतु जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे मुंब्रा स्थानकात फलाट क्रमांक चारच्या दिशेने जाणारी रेल्वेगाडी फलाट क्रमांक तीनच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाडीच्या दिशेने झुकल्याचे नमूद आहे. दोन्ही मार्गिकेवरील रुळांमधील अंतर निश्चित प्रमाणापेक्षा कमी आढळून आले.