कल्याण – येत्या शुक्रवारी १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी कल्याण डोंबिवली पालिकेने ३९ वर्षापूर्वीच्या शासन आदेशाचा आधार घेऊन पालिका हद्दीतील कत्तलेखाने बंद ठेवण्या बरोबर शहरातील मटण, मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. या फतव्यावरून विविध क्षेत्रातून तीव्र उमटल्या आहेत. पालिकेच्या या निर्णयाचा निषेध करणारा फलक हिंदु खाटिक समाज संघटनेने पाालिकेच्या कल्याणमधील मुख्यालयासमोर लावला आहे.
पालिकेच्या मनमानी कारभाराचा या फलकाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मागील अनेक वर्षात कल्याण डोंबिवली पालिकेत शेकडोच्या संख्येने शासन अध्यादेश आले. त्याची अंमलबजावणी कधी शासनाने प्रभावीपणे केली नाही. ती अंमलबजावणी केली असती तर आता ही दोन्ही शहरे स्वच्छ, सुंदर आणि बकालपणापासून वाचली असती. बेकायदा बांधकामे नियंत्रणाचे शासन आदेश काटेकोर पाळले असते तर शहरात बेकायदा बांधकामांचे पीक आले नसते. आता जुनापुराणा एक आदेश काढून शासन शहरातील मटण मांस विक्रीची दुकाने बंद ठेवत असेल. या व्यवसायातील लोकांच्या रोजीरोटीवर गदा आणत असेल तर पालिका अधिकाऱ्यांची कीव येते, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे कल्याणमधील माजी शहरप्रमुख सचिन बासरे यांनी दिली आहे.
हिंदु खाटिक समाजाच्या कल्याण डोंबिवली शाखेने पालिकेच्या मुख्यालयासमोर फलक लावून पालिकेच्या या मनमानी निर्णयाचा निषेध करणारा फलक लावला आहे. पालिकेने हा निर्णय मागे घेतला नाहीतर १५ ऑगस्टच्या दिवशी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मटण विक्रीचे दुकान थाटण्याचा इशारा हिंदु खाटिक समाज संघटनेचे अध्यक्ष शिरीष लासुरे यांंनी दिला आहे. शरद पवार राष्ट्रवादी गट, उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पालिकेच्या निर्णयाचा निषेध केला आहे.
कोणी काय खावे हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. असे असताना पालिका ठरावाचा आधार घेऊन काढलेला हा आदेश पूर्णता चुकीचा आहे. तो तात्काळ रद्द करावा, अशी मागणी हिंदु खाटिक समाजाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी शासन आणि पालिकेच्या या निर्णयावर सडकून टीका केली आहे. पालिका ही काय तुमची वतनदारी आहे का. कोणी काय खावे हे सांगायला. सगळे वाद संपल्यामुळे हा आता मांसाहरी, शाकाहरी वाद सत्ताधाऱ्यांनी बाहेर काढला आहे. १५ ऑगस्ट दिवशी कल्याणमध्ये येऊन मटण खातो, बघू कोण कारवाई करायला येतो ते बघतो, असा इशारा आमदार डाॅ. आव्हाड यांनी पालिकेला दिला आहे.
युवा नेते आदित्य ठाकरे यांनी नागरी समस्या सोडविण्याचे सोडून हे नसते उद्योग पालिका का करत आहे, असा प्रश्न केला आहे. पालिकेने या निर्णयावर आता मौनाची भूमिका घेतली आहे. फलकांवर नेहमीच कारवाई करणारे पालिका अधिकारी निषेधाच्या फलकाकडे दुर्लक्ष करत आहेत.