HSC Result Thane: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. ठाणे जिल्ह्याच्या निकालात गेल्यावर्षीच्या तुलनेत काहीशी वाढ झाली असून यंदा ९३.७४ टक्के निकाल लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही बारावीच्या परिक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यात ९५.०६ टक्के मुली उत्तीर्ण झाले असल्याची माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२४-२५ चा इयत्ता बारावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून यंदा जिल्ह्याचा ९३.७४ टक्के निकाल लागला असल्य़ाची माहिती ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली. यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यातून बारावीच्या परिक्षेला ४९ हजार ०१ मुले आणि ४७ हजार ८८ मुली असे एकूण ९६ हजार ०८९ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी ८९ हजार ८२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील उत्तीर्ण झालेल्या ८९ हजार ८२७ विद्यार्थ्यांमध्ये ४५ हजार १७० मुले आणि ४४ हजार ६५७ मुलींचा समावेश आहे.
यंदाही जिल्ह्यात बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यात ९२.४७ टक्के मुले तर, ९५.०६ टक्के मुली उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही विज्ञान शाखेचा सर्वाधिक म्हणजेच ९७.२२ टक्के निकाल लागला आहे, अशी माहिती जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली.- ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थी सरसयंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थी बारावी परिक्षेच्या निकालात सरस ठरले आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातून १५ हजार ७१० विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती. त्यापैकी १५ हजार ०७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे या महापालिका क्षेत्रात बारावीचा निकाल ९५.९४ टक्के इतका लागला आहे. उत्तीर्ण झालेल्या १५ हजार ०७३ विद्यार्थ्यांमध्ये ७ हजार ९४२ मुलांचा तर, ७१३१ मुलींचा समावेश आहे.
ठाणे जिल्ह्यातील मागील पाच वर्षाच्या निकालाची टक्केवारी
वर्ष | टक्केवारी |
२०२० | ८९.८६ टक्के |
२०२१ | ९९.८७ टक्के |
२०२२ | ९२.६७ टक्के |
२०२३ | ८८.९०टक्के |
२०२४ | ९२.०८ टक्के |
शहर- तालुका निहाय्य निकाल (टक्केवारीनुसार)
शहर | उत्तीर्ण मुले | उत्तीर्ण मुली | एकूण |
ठाणे | ९४.५० | ९६.३६ | ९५.४१ |
कल्याण – डोंबिवली | ९१.३८ | ९३.७१ | ९२.५१ |
भिवंडी | ८९.४१ | ९४.४७ | ९२.११ |
उल्हासनगर | ८९.३० | ९२.२३ | ९०.७५ |
नवी मुंबई | ९५.३६ | ९६.५९ | ९५.९४ |
मिरा – भाईंदर | ९४.४९ | ९६.१३ | ९५.३० |
कल्याण ग्रामीण | ९२.९७ | ९६.५४ | ९४.३४ |
अंबरनाथ | ९२.०१ | ९५.०९ | ९३.५५ |
भिवंडी ग्रामीण | ८९.५८ | ९५.०४ | ९२.२५ |
मुरबाड | ८२.५४ | ९३.०२ | ८८.०० |
शहापूर | ९०.८७ | ९५.९६ | ९३.५७ |
एकूण | ९२.४७ | ९५.०६ | ९३.७४ |