अंबरनाथः गणेशोत्सवात नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी महत्वाच्या रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर लावण्यात आलेल्या स्वागत कमानी उत्सव संपले तरी हटवले जात नसल्याने नागरिकांत संताप आहे. अंबरनाथ शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर राज्यमार्गावर ठिकठिकाणी विविध पक्षांच्या कमानी वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. उत्सव संपल्यानंतरही त्या जैसे ठे असल्याने दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. कोंडी सोडवण्यासाठी पालिकेत बैठका घेणारे पक्ष रस्त्यावर मात्र नागरिकांचीच वाट अडवत असल्याने त्या पक्षांविरूद्ध नाराजी आहे.

ठाणे जिल्ह्यात यंदाच्या वर्षात पावसासोबतच वाहतूक कोंडीनेही नागरिकांना जेरीस आणले. त्यावरून राज्य पातळीवर टीका झाली. ठाणे शहरातला घोडबंदरसारखा रस्ता असो वा शिळफाटा, राजणोली, कल्याण किंवा अंबरनाथ, बदलापूर. या सर्वच शहरांमध्ये वाहतूक कोंडीने साऱ्या मर्यादा ओलांडल्या. खड्डे, बंद पडणारी वाहने यामुळे अनेकदा कोंडी झाली. निर्माणाधिन रस्त्यांमुळेही कोंडी वाढली. या कोंडीवर उपाय शोधण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आक्रमक भूमिका घ्यावी लागली. तर कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.

मात्र अंबरनाथ, बदलापुरसारख्या शहरांमध्ये राजकीय पक्षांच्या चमकोगिरीमुळे नागरिकांची वाट रोखली गेल्याचे दिसून आले होते. ऐन पावसाळा भरात असताना राजकीय पक्षांकडून अंबरनाथ शहरात स्वागत कमानी लावण्यात आल्या. गणेशोत्सवाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या या स्वागत कमानी गणेशोत्सवानंतर काढल्या जातील अशी नागरिकांना आशा होती. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी कोंडीत अडकूनही त्या स्वागत कमानी सहन केल्या. त्यानंतर स्वागत कमानी हटल्या नाही तर त्या वाढल्या.

सुरूवातीला एका पक्षाने लावलेल्या कमानींमध्ये सत्ताधारी पक्षातील सहकारी पक्षानेच भर घातली. त्यांनी सुरूवातीला एका मॅरेथॉन स्पर्धेसाठी कमानी लावल्या. धावण्याच्या स्पर्धेच्या कमांनींमुळे नागरिकांना चालणेही दुरापास्त झाले. अंबरनाथ शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या मटका चौकात सध्या याच कमानींमुळे वाहनांना वळताना अडचण येत असून कोंडी होते आहे. उड्डाणपुलावर स्वागत कमान लावण्याचाही पराक्रम राजकीय पक्षांनी केला. त्यामुळे उड्डाणपुलावरील अरूंद पदपथ व्यापला गेला.

सुरूवातील गणेशोत्सव, नंतर स्पर्धा, नंतर नवरात्रोत्सव आणि त्यापुढे दसरा अशा सर्व शुभेच्छा या कमानींच्या माध्यमातून देण्यात आल्या. कमानींवरचे संदर्भ आणि शुभेच्छा बदलल्या. मात्र कमानी हटल्या नाहीत. त्यामुळे आता दिवाळीपर्यंत आणि त्यापुढच्या सणांसाठी या कमानी ठेवल्या आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. या कमानींमुळे नागरिकांत संतापाचे वातावरण असून अतिक्रमण कारवाईत दुकाने हटवणारे पालिका प्रशासनही या कमानींकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.