कल्याण: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव यशवंत भिमराव आंबेडकर यांच्या नावे डोंबिवली जवळील २७ गाव हद्दीतील शिळफाटा रस्त्यावरील दावडी गाव येथे वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीच्या महसुली कागदपत्रांवर आंबेडकर कुटुंबीयांची वारसा हक्काने नावे लावण्यात आली आहेत. तरीही, या जमिनीवर कुळवहिवाटीचा हक्क दाखवून स्थानिक भूमाफियांनी या जमिनीवर कब्जा मिळवून सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.

शिळफाटा रस्त्यावरील व्यंकटेश पेट्रोल पंपामागे, सेंट जाॅन शाळेच्या समोरील भागात दावडी येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव यशवंत भिमराव आंबेडकर यांच्या नावे असलेल्या जमिनीवर तनिष्का रेसिडेन्सी नावाने भूमाफियांनी बेकायदा इमारत बांधली आहे. या जमिनीच्या महसुली कागदपत्रांवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू नेते प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भिमराव आंबेडकर, रमाताई तेलतुंबडे यांची नावे आहेत, असे तक्रारदार रिपब्लिकन सेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मुंंबई उच्च न्यायालयाने गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या दाखल याचिकांमध्ये डोंबिवलीतील एकूण ८० बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश कल्याण डोंंबिवली पालिकेला दिले आहेत. अशा परिस्थितीत डोंबिवली जवळील दावडीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांची जमीन हडप करण्याचा प्रयत्न माफियांनी केल्याने आंबेडकरप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

रिपब्लिकन सेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे यांनी मागील चार वर्षापासून कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त, तहसीलदार, पोलीस उपायुक्त ते आय प्रभागाच्या साहाय्यक पदापर्यंत पाठपुरावा करून डाॅ. आंबेडकर यांच्या वारसांच्या नावे असलेल्या जमिनीवरील बेकायदा इमारतीवर कारवाईची मागणी केली आहे. या जमिनीवर कब्जा करणाऱ्या भूमाफियांची स्थानिक पातळीवर दहशत असल्याने या जमिनीचा ताबा घेण्यात अडचणी येत आहेत, असे नवसागरे यांनी सांगितले. मागील तीन वर्षापासून तनिष्का रेसिडेन्सी या बेकायदा इमारतींंवर कारवाई करावी म्हणून आपण पालिकेकडे पाठपुरावा करत आहोत. ही जमीन हडप करणाऱ्या भूमिपुत्र भूमाफियांवर ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे, असे नवसागरे यांनी सांगितले.

या तक्रारीच्या अनुषंगाने आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी तनिष्का रेसिडेन्सीची उभारणी करणाऱ्या भूमाफियांना जमीन, बांधकाम परवानगीची कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटिसा पाठवल्या होत्या. पालिकेला भूमाफियांनी प्रतिसाद दिला नाही. आय प्रभागाने तनिष्का रेसिडेन्सीचे बांधकाम अनधिकृत घोषित केले आहे. हे बांधकाम स्वताहून तोडून टाकण्याची नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दोन वेळा हे बांधकाम तोडण्याची कार्यवाही पालिकेकडून करण्यात आली होती. त्यावेळी पोलीस बंदोबस्त मिळाला नव्हता, असे आय प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

डोंबिवलीत दावडी येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावे असलेल्या जमिनीवरील बेकायदा इमारतीवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. लवकरच ही इमारत शक्तिमान कापकाम यंत्राने भुईसपाट केली जाणार आहे. -भारत पवार, साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग.