डोंबिवली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा प्रतिष्ठेचा असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांना अद्याप उमेदवारी घोषित करण्यात आलेली नसली तरी शिवसेनेच्या वतीने श्रीकांत शिंदे यांच्या विविध विकासकामांचे होर्डिंग्ज लावण्यात आलेले आहेत. ‘आमचं काम बोलतं’ या घोषवाक्यातून विविध कामे यातून दाखवण्यात आली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून वैशाली राणे दरेकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आल्यानंतर त्यांनी अनेकदा श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची टीका किंवा प्रत्युत्तर न देता शिंदे यांनी अनुल्लेखाने टाळण्याचे ठरवल्याचे दिसून आले आहे. त्यातच आता ‘आमचं काम बोलतं’ या प्रचार मोहिमातून विरोधकांना ही लोकसभा निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावरच लढवणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितल्याचे दिसून येते आहे.

हेही वाचा : श्रीकांत शिंदे यांच्या कार्यअहवालावर राज ठाकरे यांची छबी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी डोंबिवलीत प्रकाशन

कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या दोन्ही गटांनी प्रतिष्ठेचा केलेला आहे. यापूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देऊन चूक केली पण ही चूक आता सुधारायची आहे l, असे परखड मत उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघात आले असताना व्यक्त केले होते. त्यानंतर हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा आणि चर्चेचा विषय झाला होता. ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी मतदारसंघात यापूर्वी येऊन विविध विधाने केली. लोकसभा निवडणुकीचे घोषणा झाल्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध कोण उमेदवार असेल याच्या अनेक चर्चा झाल्या होत्या. या चर्चेत अनेक दिग्गज नेत्यांची नावेही आली होती. मात्र या सर्वांना मागे टाकत डोंबिवलीच्या वैशाली दरेकर यांना उद्धव ठाकरे यांनी संधी दिली. त्यांना दिलेल्या उमेदवारीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. ठाकरे गटाने आपला उमेदवार निवडला असला तरी शिवसेना शिंदे गटाकडून अजून श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील असे वारंवार अनेक नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : आमदार रईस शेख यांचा राजीनामा मागे, म्हणाले, “पक्षातून दलालांची…”

श्रीकांत शिंदे सध्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर प्रचार करताना दिसत आहेत. तर वैशाली दरेकरही प्रचार करताना दिसतात. या प्रचारात वैशाली दरेकर यांनी अनेकदा खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. मात्र श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या कोणत्याही टिकेल अद्याप उत्तर दिलेले नाही. त्यामुळे आपण दरेकर यांच्या टीकेला उत्तर देणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले आहे. असे असतानाच रविवारी श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवालाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन होते आहे. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी कल्याण शीळ रस्त्यावरील सर्व महत्त्वाच्या होर्डिंगवर ‘आमचं काम बोलत ‘ ही प्रचार मोहीम सुरू झाल्याचे दिसून आले. कल्याण लोकसभेत केलेल्या अनेक विकास कामांचा यात समावेश आहे. त्यामुळे कल्याण लोकसभेत प्रचारात विकासाच्या मुद्द्यांवरच भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.