अंबरनाथः राज्यातील प्रतिष्ठेच्या झालेल्या कल्याण लोकसभेत मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे आपला अर्ज भरणार असतानाच त्याच्या दोन दिवस आधी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अंबरनाथमधील काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील यांनी रविवारी ७ माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रदीप पाटील काँग्रेसचे निष्ठावंत मानले जातात. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्याविरूद्ध महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र डॉ. शिदे यांच्याविरूद्ध महाविकास आघाडीचे घटक पक्ष प्रचारात सक्रीय नसल्याचे चित्र आहे. दोनच दिवसांपूर्वी कल्याणच्याकाँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवार विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला होता. त्याच्या दोनच दिवसांनी रविवारी महाविकास आघाडीला काँग्रेसच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा : एम. के. मढवी यांच्याविरोधातील तक्रारदार भाजपचा पदाधिकारी ?

रविवारी ठाण्यातील निवासस्थानी काँग्रेस नगरसेवकांचा प्रवेश पार पडला. त्यामुळे अंबरनाथमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला. अंबरनाथचे प्रदीप पाटील हे १९९५ पासून अंबरनाथ नगरपालिकेत नगरसेवक असून माजी विरोधी पक्षनेते सुद्धा राहिले आहेत. अंबरनाथ शहराच्या पश्चिमेला काँग्रेसचा मोठा मतदार आहे. त्यामुळे प्रदीप पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाने डॉ. श्रीकांत शिंदे यांना फायदा होणार आहे. अंबरनाथ शहरात प्रदीप पाटील यांनी मागील अनेक वर्षे काँग्रेसची एकहाती धुरा सांभाळली. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे प्रदीप पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

हेही वाचा : डोंबिवलीतील मोठागाव माणकोली पूल चार दिवस वाहतुकीसाठी बंद

प्रदीप पाटील यांच्यासह माजी नगरसेविका अर्चना रसाळ, चरण रसाळ, माजी नगरसेवक सुरेंद्र यादव, बबन तांबे, मनोज देवडे, बिस्मिल्ला शेख, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा स्मिता बंगेरा, नयना पवार, विद्या नागदिवे, अर्चना प्रसाद, मनीषा परमल, युथ काँग्रेसचे हर्षल भोईर, देवराज अल्झानडे, संकेत तांबे, आशिष डुबली, ईशान जाधव, अश्फाक खान, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष नईम शेख यांच्यासह सुधीर जाधव, ज्ञानेश्वर शेलार, अनिल कांबळे, प्रशांत उतेकर हे प्रमुख पदाधिकारी तसेच शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. आगामी काळात पूर्ण ताकदीने शिवसेनेचे काम करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रदीप पाटील यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyan 7 former corporators including congress leader pradeep patil joined cm eknath shinde s shivsena css