कल्याण : कल्याण मधील कोळीवाडा भागात राहत असलेला व एका गुन्ह्यात तळोजा कारागृहात शिक्षा भोगत असलेला एक कैदी मागील तीन वर्षापासून फरार आहे. तळोजा कारागृह प्रशासनाला या कैद्याने दिलेल्या हमीपत्राप्रमाणे विहित वेळेत तुरुंगात दाखल होणे अपेक्षित होते. हा कैदी कारागृहात दाखल न झाल्याने तळोजा कारागृह प्रशासनाने या कैद्या विरुध्द बाजारपेठ पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार केली.

कारागृह प्रशासनाने या कैद्याला फरार घोषित केले आहे. गणेश श्रीराम तायडे (३०, रा. कोळीवाडा, कल्याण पश्चिम) असे फरार कैद्याचे नाव आहे. शस्त्रास्त्र कायद्याने आरोपी गणेश तायडेवर सात वर्षापूर्वी मुंबईतील कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्या प्रकरणी पनवेल न्यायालयात कामोठे पोलिसांकडून खटला दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने विनावापर शस्त्रास्त्राचा वापर केल्याने आरोपी गणेश तायडे याला तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा आणि सहा हजार रूपये दंड ठोठावला होता.

हेही वाचा : ठाण्यातील ‘गोएंका इंटरनॅशनल स्कूल’मधील लहान मुला मुलींचा विनयभंग

गणेश तळोजा कारागृहात शिक्षा भोगत होता. या कालावधीत करोना महासाथ सुरू झाली. करोना महासाथीच्या काळात राज्यातील सर्व कैद्यांना मुक्त करण्यात आले होते. त्याप्रमाणे गणेशची सुटका करण्यात आली होती. सुटकेच्या काळात गणेशने दररोज कल्याणमध्ये राहत असताना बाजारपेठ पोलीस ठाण्यात एक दिवस हजेरी लावणे आवश्यक होते. गणेश याने हजेरी नाहीच, पण शासन आदेशानुसार विहित वेळेत तळोजा कारागृहात हजर होणे आवश्यक होते. त्या काळात तो कारागृहात हजर झाला नाही. त्याच्या कल्याण मधील घरी पोलिसांनी वारंवार नोटिसा देऊनही तो त्या नोटिसांना प्रतिसाद देत नव्हता. ४५ दिवस अभिवचन रजेवर असलेला गणेश जून २०२२ मध्ये कारागृहात हजर होणे आवश्यक होते. दोन वर्ष उलटुनही गणेश तळोजा कारागृहात हजर झाला नाही. वारंवार समज देऊनही गणेश नियमबाह्यपणे फरार झाला आहे. त्यामुळे तळोजा कारागृह प्रशासनातील हवालदार नवनाथ सावंत यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.