ठाणे : जितेंद्र आव्हाड यांनीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात आम्हाला आंदोलन करायला लावले, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी बुधवारी केला. अजित पवार हे नेहमी आव्हाड यांच्यामागे सह्याद्रीसारखे ठाम उभे राहिले. पण जितेंद्र आव्हाड यांनी कायमच अजित पवार यांचा तिरस्कार व दुस्वास केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. जितेंद्र आव्हाडांच्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख करत अजित पवारांनी टीका केली होती. यावर आता आव्हाड यांनी प्रत्युत्तर देत आपल्या एक्स खात्यावर पोस्ट लिहून अजित पवारांवर मिश्कील टिप्पणी केली. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांच्या वाढलेल्या पोटाचा फोटोही शेअर केला. त्यास आता राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

हेही वाचा : कबड्डीपटूंना महापालिका कायम सेवेत करण्यासाठी धोरण ठरवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जितेंद्र आव्हाड यांनी काल मध्यरात्री अजितदादांचे चित्र ट्विट केले होते. तेव्हा ते त्यांनी कोणत्या अवस्थेत केले होते हे माहित नाही. पण आज त्यांनी अजित पवार यांना लवासा प्रकरणी, सिंचनप्रकरणी डिफेंड केल्याचा दावा केला आणि आपण कोणावरही व्यक्तीगत टीका करत नाही असे म्हटले. मुळात डॉ जितेंद्र आव्हाड यांना त्यावेळी महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हायचे होते, टीव्ही चॅनलवर आपला टीआरपी वाढवायचा होता म्हणून ते प्रतिक्रिया देत होते. परंतु अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असताना २००९ ते २०१४ साली आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा या मतदारसंघात सर्वाधिक निधी दिला यामुळेच आव्हाड यांच्या मतदारसंघात विकासाची कामे झाली आहेत, असे परांजपे म्हणाले.

हेही वाचा : बदलापुरातील वालिवली पूल वाहतुकीसाठी बंद

विनयभंगाच्या केसमध्ये आव्हाड हे खचले असताना त्यांच्या घरी साडेतीन तास अजित पवार हे त्यांना धीर देत बसले होते, पोलीसांनी खोटे गुन्हे दाखल केले म्हणून अजित पवार यांनी पोलिसांना झापले होते. आव्हाड हे तेव्हा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत होते. यावेळी धीर देऊन अजित पवार यांनी त्यांना सावरले होते. अजित पवार हे नेहमी आव्हाड यांच्या मागे सह्यादीसारखे ठाम उभे राहिले. पण आव्हाड यांनी कायमच त्यांचा तिरस्कार व दुस्वास केला. अजित पवार यांच्याविरोधात आम्हांला आंदोलन करायला लावले, असा गौप्यस्फोट परांजपे यांनी केला.

हेही वाचा : ठाणे: मेट्रोच्या कामादरम्यान गर्डरवरून खाली पडून कामगाराचा मृत्यू

आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे तोंड कोंबडीच्या कोणत्या भागासारखे दिसते अशी टीका केली होती तर उपसभापती निलमताई गोऱ्हे या राजकारणात किती साड्या बदलतात, अशी टीका केली आहे तर पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप करताना चिक्की खाताना आव्हाड यांनी केलेले विभस्त तोंड सर्वांनी पाहिले आहे. किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावरही व्यक्तीगत टीका आव्हाड यांनी नेहमीच केली आहे. पण जेव्हा त्यांच्यावर टीका होते तेव्हा ते बिथरतात, असे परांजपे यांनी स्पष्ट केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane ncp leader anand paranjape said jitendra awhad told us to do agitation against ajit pawar css