कल्याण – कल्याण पश्चिमेत मागील सात दिवसांंच्या कालावधीत नवजात बालक रस्त्यावर फेकण्याचा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. अनैतिक संबंधातून जन्माला आलेली ही बालके काही प्रेमीयुगल कुटुंंबीयांनी काही कळू नये म्हणून असे प्रकार करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. गेल्या आठवड्यात बारावे यथील शिवमंदिराजवळील कचराकुंडी जवळ स्त्री जातीचे अर्भक सापडले होते. आता उल्हास नदी काठी मोहने भागात पत्रा चाळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका झुडपात पुरूष जातीचे दोन महिन्याचे बाळ आढळून आले आहे.

बारावे येथील शिवमंदिराजवळील कचराकुंडी जवळ स्त्री जातीचे नवजात बालक टाकून देणाऱ्या एका तरूणाला खडकपाडा पोलिसांनी यापूर्वीच अल्पवयीन बालकांचे संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या तरूणाने एका तरूणी बरोबरच्या अनैतिक संबंधातून स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिला असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

या प्रकरणातील सहभागी तरूणीलाही पोलिसांनी चौैकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच आता खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीत उल्हास नदी काठी नीरा विक्री केंद्र टपरीच्या पाठीमागे, पत्राचाळकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर झाडाझुडपांच्या आडोशाने पुरूष जातीचे दोन महिन्याचे बाळ पादचाऱ्यांना आढळले. खडकपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.

उल्हास नदी काठी दोन महिन्याचे जिवंत बाळ झाडझुडपात ठेऊन देणाऱ्यांविरूध्द सुरक्षारक्षक शिरीष शिंदे यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. तक्रारदार शिंदे हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. ते पाच दिवसापूर्वी पायी रात्रीच्या वेळेत घरी भोजनाचा डबा घेण्यासाठी पत्रा चाळ भागात उल्हास नदी पुलावरून पायी चालले होते. त्याचवेळी तेथून त्यांचे परिचित गंगाराम शर्मा शहाड येथे घरी चालले होते.

गंगाराम यांना रात्री पावणे दहा वाजण्याच्या दरम्यान पत्रा चाळ रस्त्यावर उल्हास नदीकाठी नीरा विक्री टपरीच्या मागे झुडपातून बाळ रडण्याचा आवाज आला म्हणून त्यांनी झुडपाच्या दिशेने जाऊन पाहिले तर तेथे एक पुरूष जातीचे बाळ झुडपाच्या आडोशाला ठेवलेले आढळले. त्याचवेळी तेथून सुरक्षा रक्षक शिरीष शिंदे पायी चालले होते. शर्मा यांनी शिंदे यांना थांबवून घडला प्रकार सांगितला.

दोघांनी परिसरात या बाळाचे कोठे पालक आहेत ते पाहिले पण ते आढळून आले नाहीत. शिरीष शिंदे यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क केला. तेथून खडकपाडा पोलिसांना ही माहिती देण्यात आली. खडकपाडा पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी गंगाराम शर्मा यांच्या ताब्यातून बाळ ताब्यात घेतले. ते पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. खडकपाडा पोलिसांनी बाळाचा जीव धोक्यात घालण्याची कृती करणाऱ्या अज्ञात इसमा विरुध्द अल्पवयीन मुलांचे संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून शोध घेत आहेत.

अनैतिक संबंधातून हे बाळ जन्मले असावे आणि प्रेमीयुगलाने ते कुटुंबीयांना कळू नये म्हणून झुडपात आणून ठेवले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.