ठाणे : धुळे ते सीएसएमटी एक्स्प्रेसमधून प्रवास करताना सहप्रवाशांसोबत झालेल्या वादानंतर एका ७२ वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याचा संदेश समाज माध्यमांवर प्रसारित झाला असून याबाबत आता लोहमार्ग पोलिसांनी स्पष्टीकरण देत वृद्ध सुखरूप असल्याचे म्हटले आहे. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

अश्रफ अली सय्यद हुसेन (७२, राहणार-जळगाव) हे २८ ऑगस्ट रोजी धुळे ते सीएसएमटी एक्स्प्रेसने त्यांच्या मुलीकडे कल्याण येथे येत जात होते. या प्रवासा दरम्यान बसण्याच्या जागेवरून त्यांचा इतर सहप्रवाशांसोबत वाद झाला होता. या बोगीतील सहप्रवाशांनी या घटनेची चित्रफीत तयार करून ती समाज माध्यमांवर प्रसारित केली. या घटनेच्या अनुषंगाने ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गोपाळ यांनी त्या वृद्धाचा शोध घेतला असता, ते कल्याण येथे मुलीच्या घरी असल्याचे समोर आले. तिथे जाऊन गोपाळ यांनी त्या वृद्धांकडून घटनेची माहिती घेऊन त्यांची तक्रार घेतली. या तक्रारीच्या आधारे ठाणे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेतील संशयित आरोपींना पोलिसांनी धुळे येथे ताब्यात घेतले असून त्यांना आणण्यासाठी पथक रवाना झाले आहे. सीसीटीव्हीतील चित्रीकरण आणि प्रसारित झालेली चित्रफीत तपासून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत, असे लोहमार्ग पोलिसांनी स्पष्ट केले. असे असतानाच तक्रारदार वृद्धाने आत्महत्या केल्याचा संदेश समाज माध्यमांवर प्रसारित झाला असून याबाबत आता लोहमार्ग पोलिसांनी स्पष्टीकरण देत वृद्ध सुखरूप असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा – ठाण्यात भाजप, ठाकरे गटाचा संयुक्त मोर्चा ? कोलशेतमध्ये स्थानिकांच्या रोजगारासाठी ग्रामस्थांनी काढला मोर्चा

हेही वाचा – टिटवाळ्याजवळील दहागावमध्ये दोन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

अफवांवर विश्वस ठेवू नका – लोहमार्ग पोलीस

अश्रफ अली सय्यद हुसेन हे प्रवासी सुखरुप आहेत. त्यामुळे समाज माध्यमांवरून पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर कोणीही विश्वास ठेऊ नये तसेच कोणतीही खातरजमा न करता समाज माध्यमांवर प्राप्त चित्रफीत प्रसारित करू नये, असे आवाहन मुंबई लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.