Sharad Pawar NCP Protest Against Election Commission, jitendra awhad ठाणे – निवडणूक आयुक्तांची नियुक्ती मतचोरीसाठी हेतुपुरस्सर केली गेल्याचा गंभीर आरोप करत, निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने मुंब्र्यात मंगळवारी करण्यात आली. निवडणूक आयोग बरखास्त करा या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना नियुक्ती समितीमधून वगळून भाजपला फायदा देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. हे आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी आंदोलकांनी निवडणूक आयोगाविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी, लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या मदतीने सत्ताधाऱ्यांनी मत चोरी केली होती, हे सप्रमाण दाखवून दिले. तसेच, नवी दिल्ली येथे सोमवारी शरद पवार (Sharad Pawar) , मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राहुल गांधी यांनी आंदोलन केले होते. त्याच अनुषंगाने मंगळवारी मुंब्रा येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार सय्यद अली अशरफ, अशरफ शानू पठान, शमीम अहमद खान यांच्या सहकार्यातून मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा शहराच्या विविध भागातील शेकडो नागरिक हातात संविधानाच्या प्रती तसेच निवडणूक आयोगाच्या निषेधाचे फलक घेऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमा झाले होते. आंदोलकांनी निवडणूक आयोग चोर है; वोट चोर … गद्दी छोड; पहले लढे थे गोरो से… अब लडेंगे वोटोचोरोसे, मुर्दाबाद, इलेक्शन कमिशन मुर्दाबाद, वोट बचाने निकले है… आवो हमारे साथ चलो, वोट चोरो सावधान.. जाग उठा है हिंदूस्थान , अशा घोषणा दिल्या.
यावेळी मर्जिया शानू पठाण म्हणाल्या की, संविधानाने निवडणूक आयोगाला स्वायत्तता दिली आहे. मात्र, आता निवडणूक आयोग हे हुकूमशहाच्या अधिपत्याखाली काम करीत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतांची चोरी करून सत्ताधारी निवडले आहेत. एकाच घरात ८० लोक, एका इमारतीत ७ हजार मतदार, ८० वर्षांची नवमतदार, एकाच माणसाचे पाच राज्यातील मतदार याद्यांमध्ये समावेश हे सर्व पुराव्यानिशी राहुल गांधी यांनी उघडकीस आणले आहे. एका मतदारसंघात लाखभर मतांची चोरी होत असेल तर, सबंध देशभरात एकूण लोकसंख्येपेक्षा अधिक मतदार या निवडणूक आयोगाने दाखवून भाजपला निवडणूक जिंकून दिली आहे. याचाच अर्थ ही लोकसभेची निवडणूक बेकायदेशीर आहे, असे आरोप यावेळी करण्यात आले. या आंदोलनात फरज़ाना शाकिर शेख, शाकिर शेख, साकिब दाते, नाज़िम खान बुबेर, महशर शेख, इमरान शेख, समीर मालिक यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.