ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्रित येण्याची भुमिका नुकतीच मांडली असून या भुमिकेनंतर संपुर्ण राज्यात दोघा भावांनी एकत्रित येण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समाजमाध्यांवर दोन्ही नेत्यांना एकत्रित येण्याची विनवणी करीत असले तरी दोन्ही पक्षातील काही नेत्यांकडून विरोधी प्रतिक्रिया आल्या तर, एकत्रित येण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात, अशी भिती कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यावरच आता आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी समाजमाध्यांवर एक संदेश प्रसारित करत दोन्ही पक्षातील नेत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
काही दिवसांपूर्वी सिने अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. त्यामध्ये माझ्यातील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद हे महाराष्ट्र हितापुढे किरकोळ असून ते कधीही मिटू शकतात, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर मुंबईत भारतीय कामगार सेनेच्या पार पडलेल्या मेळाव्यात शिवसेना (ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील महाराष्ट्राच्या हिताकरिता किरकोळ वाद बाजूला ठेऊन एकत्र येण्यास तयार असल्याचे संकेत दिले. यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला जोर आला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघा बंधूंनी एकत्र यावे अशी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. कार्यकर्त्यांनी तशी इच्छाही बोलून दाखविली होती. मात्र, काही कारणास्तव दोन्ही नेते एकत्र येत नसल्याचे चित्र होते. परंतु दोन्ही ठाकरे बंधूंनीच आता एकत्रित येण्याचे विधान करत तशी पाऊले टाकली आहेत. यामुळे कार्यकर्त्यांनीही आता समाजमाध्यांवर दोन्ही नेत्यांनी एकत्रित यावेत, अशा स्वरुपाच्या पोस्ट टाकल्या आहेत. उबाठा पक्षाचे जे जुने शिवसैनिक आहे, त्यांनी देखील ठाकरे बंधुंनी एकत्र यावे अशी आशा व्यक्त केली आहे.
शिवसेना दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे शिवसेना (ठाकरे) पक्षात कार्यरत असून ते पक्षाचे ठाणे जिल्ह्य प्रमुख म्हणून काम पाहात आहेत. त्यांनी आता ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याच्या विधानावर आपले मत समाजमाध्यांवर व्यक्त केले आहे. ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ आहेत. महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचे झाल्यास त्याचा निर्णय हे दोन्ही बंधू घेतील. राज आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी दोन पावले पुढे टाकलेले असताना अन्य नेत्यांनी भाजपला फायदा होईल अशी भूमिका घेऊन टीकाटिपणी करू नये, असा सल्ला त्यांनी दोन्ही पक्षातील नेत्यांना दिला आहे.