कल्याण : गेल्या मार्चमधील विधिमंडळ अधिवेशनात मंजुरी मिळालेल्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कुरुंंग गाव हद्दीतील पोशीर धरण प्रकल्प उभारणीसाठी या धरणाचे भविष्यात पाणी वापरणाऱ्या लाभार्थी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवी मुंबई, उल्हासनगर महानगरपालिक, बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिका प्रशासनांनी आपल्या वाट्याच्या भांडवली खर्चातील हिस्सेदारी आवश्यक निधीची तरतूद पुढील वर्षात करण्यात यावी, असे निर्देश ठाणे येथील कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विनोद मुंंजाप्पा यांनी दिले आहेत.

कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या या गतिमान हालचालींमुळे पोशीर धरण प्रकल्पाच्या कामाला लवकरच प्रारंभ होऊन विहित वेळेत हा प्रकल्प बांधून पूर्ण करण्याचे नियोजन महामंडळाचे आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील वाढते नागरीकरण विचारात घेऊन या भागातील मूळ आणि वाढीव वस्तीची तहान एकट्या बारवी धरणाच्या माध्यमातून भागविणे शक्य होणार नाही. त्यामुळे बारवी धरणाला पर्याय म्हणून एमएमआर विभागातील वाढत्या नागरीकरणाचा विचार करून रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पोशीर नदीवर धरण बांधण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून बदलापूर येथील शेतकरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष राम पातकर शासनाकडे करत आहेत. एमएमआरडीएचे सदस्य असताना या धरण उभारणीचा प्रस्ताव पातकर यांच्या पुढाकाराने करण्यात आला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातकर यांनी प्रत्यक्ष भेटी घेऊन एमएमआर विभागातील पोशीर धरण किती महत्वाचे आहे हे पटवून दिले. त्यानंतर गतिमान हालचाली झाल्या. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने शासनाकडे पोशीर धरण प्रकल्प उभारणीसाठीचा सहा हजार ३९४ कोटीचा एक प्रस्ताव पाठविला. शासनाच्या आवश्यक प्रशासकीय, तांत्रिक मंजुऱ्या मिळाल्यानंतर हा प्रस्ताव मागील मार्चमधील विधिमंडळ अधिवेशनात मंजूर झाला.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे नगरविकास विभागाने या कामासाठी निधीची उपलब्धता करून द्यावयाची आहे. त्यामुळे नगरविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या लाभार्थी महापालिका, नगरपालिकांना भागभांडवली खर्चातील समान हिश्श्याने निधी कोकण पाटबंंधारे विकास महामंडळाला उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. या धरण प्रकल्पासाठी खासगी, वन जमिनीचे भूसंपादन करणे, त्याचा मोबदला बाधितांना देणे, प्रकल्प कामाच्या प्रारंभिक सर्वेक्षण अन्य कामांसाठी एजन्सींना अग्रीम रकमा द्याव्या लागणार आहेत. ही सर्व कामे पाणी वापर करणाऱ्या लाभार्थी संस्थांकडून मिळणाऱ्या निधीतून केली जाणार आहेत. त्यामुळे कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने पुढील वर्षासाठी आपल्या वाट्याच्या हिश्श्याची तजविज करण्याची सूचना लाभार्थी नवी मुंंबई, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका आणि एमएमआरडीएला केली आहे.

प्रकल्पाच्या सहा हजार ३९३ कोटी खर्च हिश्श्यातील एमएमआरडीएला दोन हजार १७१ कोटी ४५ लाख, नवी मुंबई पालिका दोन हजार ७८३ कोटी, उल्हासनगर पालिका ६११ कोटी २८ लाख, बदलापूर नगरपालिका ३७५ कोटी ९७ लाख, अंंबरनाथ नगरपालिका ४५२ कोटी उभारावे लागणार आहेत. उल्हासनगर पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी आगामी वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पात ६१ कोटी निधीची तरतूद करणार असल्याचे पाटबंंधारे मंडळाला कळविले आहे. दगड, मातीच्या या धरणात ३४९ दशलक्ष घनमीटर पाणी साठ्याचे नियोजन आहे.