Crime Story : ठाणे : प्रेमात अखंड बुडालेल्या एका ४३ वर्षाच्या व्यक्तीचे विवाहीत महिलेसोबत प्रेम जडले. त्याने तिला पळवून नेत नव्याने संसार थाटला. तिच्यापासून एक मुलही झाले. परंतु त्या प्रेयसीला आता दुसराच पुरूष आवडू लागला. ती दुसऱ्या सोबतही पळून गेली. त्यांनी आता त्याच्या गेम करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या प्रियकराने त्याच्या मित्रांसोबत एकत्र येऊन पहिल्या प्रियकराला खाडीत ढकलून दिले. पण तो वाचला आणि हत्येचा डाव फसला. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. तर इतर तिच्या प्रियकरासह इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. नेमके

प्रकरण काय आहे, वाचूया..

वांगणी येथे ४३ वर्षीय व्यक्ती राहतो. २००८ मध्ये तो कळवा येथे त्याच्या मित्राकडे वास्तव्यास आला होता. त्यावेळी त्याची ओळख एका विवाहीत महिलेसोबत झाली. महिला आणि तिच्या पतीमध्ये वारंवार वाद होत असे. त्यामुळे ती महिला तिच्या पतिला सोडून मुंब्रा येथे तिच्या आईकडे राहण्यास गेली. तो व्यक्ती आता तिला भेटण्यास मुंब्रा येथे जात असे. दोघांमध्ये प्रेम जुळले आणि २०१२ मध्ये तो महिलेला घेऊन मुंब्रा रेतीबंदर येथे राहण्यास गेला. त्यावेळी तिची पहिल्या पतीपासून झालेली मुलगी देखील त्यांच्यासोबत होती. २०१६ मध्ये महिलेला तिच्या प्रियकरापासून मुलगा देखील झाला.

काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्याच्या प्रेयसीची ओळख आणखी एका तरुणासोबत झाली. याची माहिती व्यक्तीला मिळाल्यानंतर तो प्रेयसी आणि दोन्ही मुलांना घेऊन बदलापूर येथे राहण्यास गेला.

वाढदिवस आणि वाद

प्रेयसीचा यावर्षी जानेवारी महिन्यात वाढदिवस होता. त्यावेळी तिच्या ओळखीच्या त्या तरुणाने संदेश पाठविला. त्यामुळे संतापलेल्या त्या व्यक्तीने वाद घातला. अखेर महिन्याभराने त्याची प्रेयसी त्याला सोडून तिच्या दुसऱ्या प्रियकराकडे निघून गेली. ती कुठे राहण्यास गेली याची माहिती देखील त्याला नव्हती.

पत्ता मिळाला अन् हत्येचा डाव

त्या व्यक्तीला अचानक त्याच्या मित्राने संपर्क साधला. त्याची प्रेयसी ठाण्यातील माजिवडा भागात राहत असल्याची माहिती त्याने दिली. पत्ता मिळताच त्याने १९ सप्टेंबरला तिचा शोध घेतला. त्यांची भेट झाली. प्रेयसीने त्याच्या मुलाला येथून घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर तो मुलाला घेऊन मूळ घरी वांगणी येथे गेला. २१ सप्टेंबरला, दोन दिवस राहिल्यानंर पु्न्हा तिच्या घरी आला. पण घराला कुलूप होते. त्याने तिला मोबाईलद्वारे संपर्क साधला असता, तिने मुलाला शेजरच्या घरी ठेवण्यास सांगितले. त्याच दिवशी रात्री तो व्यक्ती घरी जाण्यास निघाला असता, प्रेयसीने त्याला संपर्क साधून घरी बोलावले. व्यक्ती घराजवळ आला असता तिचा दुसरा प्रियकर, त्याचे दोन साथिदार तेथे उभे होते. त्यांनी व्यक्तीला धमकावले. तसेच त्याला एका रिक्षात बसवून मुंब्रा रेतीबंदर येथे घेऊन गेले.

‘इसको खत्म करो’

रेतीबंदर येथे पोहचल्यानंतर त्यांनी व्यक्तीला मारहाण केली. काही वेळाने त्याच्या प्रेयसीने तिच्या दुसऱ्या प्रियकराला संपर्क साधला. ‘मैने इसको बहुत मारा, इसका हाथ पैर अच्छी तरह से तोडा है’ असे तो फोनवर म्हणाला. त्यावर ‘इसको मार के खत्म कर दो, ये वापस नही आना चाहिए’ असे ती म्हणाली. महिलेने काही वेळ संवाद साधल्यानंतर तिचा प्रियकर व्यक्तीकडे आला. तोपर्यंत त्यांचा एक सहकारी निघून गेला होता. मग दोघांनीच त्या व्यक्तीला पुन्हा रिक्षात बसविले आणि खारेगाव खाडी पुलावर नेले. तिथे रिक्षा थांबविली. रिक्षातून बाहेर पडताच, ‘चल आली तुझी जागा’ असे म्हणत त्याला खाडीत फेकून देण्यात आले.

असा वाचला जीव

खाडीत पाण्याचा प्रवाह होता. त्या व्यक्तीला पोहता येत नव्हते. त्यामुळे प्रवाहातून वाहत जाताना त्याला खाडीमध्ये सिमेंटचा खांब पकडला. त्याने बचावासाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी खाडी पूलावरून जाणाऱ्या नागरिकांचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्यांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिली. तरुणाचा जीव वाचला. परंतु सुरुवातीला त्याने घटनेची माहिती दिली नाही. त्याच्यावर कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार झाले. २२ सप्टेंबरला त्याला उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

तु वाचलास कसा, प्रेयसीचा प्रश्न ऐकून व्यक्ती अस्वस्थ

व्यक्तीने तात्काळ प्रेयसीच्या आईचे घर गाठले. तसेच तिला घडलेला प्रकार सांगितला. तिला मोबाईलवर संपर्क साधला असता, ‘तुला पोहता येत नाही तर वाचलास कसा?, असे ती म्हणाली. व्यक्तीला अस्वस्थ वाटल्याने त्याने अखेर मंगळवारी याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.