ठाणे : राज्यातील एका सत्ताधारी पक्षाशी संदर्भात असलेल्या आमदारासोबत हनी ट्रॅपचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांना अश्लील छायाचित्र पाठवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा आणि त्यांची राजकीय कारकीर्द संपविण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २०००- ६७ आणि भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ चे कलम ३०८ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

आमदारांनी स्वत: याप्रकरणी तक्रार दाखल केल्याने हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते २०२४ मध्ये ते विधानसभा मतदारसंघात असताना त्यांच्या व्हाॅट्सॲप क्रमांकावरून एक महिला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती. सुरुवातीला त्यांनी त्या काॅलकडे दुर्लक्ष केले.

परंतु वारंवार संपर्क होत असल्याने त्यांनी काही वेळाने तो काॅल उचलला. त्यावेळी महिलेने त्यांच्यासोबत मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली. ती महिला वांरवार त्यांना संपर्क साधू लागली होती. अखेर त्यांनी तिला ब्लाॅक केले. २०२४ मध्ये विधानसभा निवडणूक लढविण्याचे ठरविल्यानंतर त्यांना महिलेने पुन्हा एकदा दुसऱ्या एका मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

प्रचारादरम्यान व्यस्त असताना ती त्यांना दररोज अश्लील छायाचित्र पाठवू लागली होती. आमदारांनी तिला नकार दिला असता, ती त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी देऊ लागली.

अखेर आमदारांची पोलीस ठाण्यात तक्रार

सुमारे महिन्याभरापूर्वी महिलेने पुन्हा एकदा त्यांना वेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच अश्लील छायाचित्र पाठवून तिने पाच ते १० लाख रुपयांची मागणी केली. हा प्रकार आमदार यांचा राजकीय कारकीर्द संपविणारा असल्याने त्यांनी तात्काळ याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे.