ठाणे : डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह लोकपर्णानंतर अवघ्या काही महिन्यातच मुख्य रंगमंचाच्या छताचे कोसळलेले प्लॅस्टर, त्यापाठोपाठ लघुनाट्यगृहात झालेली पाणी गळती, यासह इतर तक्रारींमुळे नाट्यगृहाच्या बांधकाम गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह प्रश्न उपस्थित होत आहेत. असे असतानाच, १५ वर्षांतच डॉ. घाणेकर नाट्यगृहाच्या नूतनीकरण करण्याची वेळ आली आहे.
राज्य शासनाने यासाठी तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, लवकरच दुरुस्तीची कामे सुरू होणार आहेत. गडकरी रंगायतन नुकतेच नूतनीकरणानंतर खुले झाले असताना, घोडबंदर परिसरातील घाणेकर नाट्यगृह पुन्हा दुरुस्तीमुळे बंद होणार आहे.
ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे. तर, नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर भागात डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे. शहराचा मानबिंदू असलेली ही दोन्ही नाट्यगृहे सांस्कृतिक चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून परिचित आहेत. हिरानंदानी बिल्डर्स यांच्या माध्यमातून सुमारे ६० कोटी खर्चून बांधलेले घाणेकर नाट्यगृह बांधण्यात आले.
२०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीपूर्वी हे नाट्यगृह नागरिकांसाठी खुले करण्यात आले. मुख्य नाट्यगृहाची आसनक्षमता सुमारे १०९५ तर लघुनाट्यगृहाची क्षमता १८२ इतकी आहे. या नाट्यगृहांमध्ये सुट्टीच्या दिवशी तब्बल पाच हजारांपर्यंत रसिक उपस्थित राहतात.
लोकपर्णानंतर काही महिन्यातच म्हणजेच डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या प्लास्टर ऑफ पॅरिसचे छत २५ एप्रिल २०१२ रोजी रात्री कोसळले होते. त्यानंतर पालिकेने छताच्या दुरुस्तीचे काम सुरू केले होते. हे काम पूर्ण होण्यास दीड वर्ष लागल्याने त्या कालावधीत हे नाटय़गृह बंदच होते. या दुरुस्तीनंतर घाणेकर नाटय़गृह पुन्हा प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले. मात्र, या नाटय़गृहातील लघुनाटय़गृहात गळती सुरू झाली होती. दुरुस्तीच्या कामासाठी लघुनाटय़गृह बंद ठेवण्यात आले होते.
आता पुन्हा मुख्य छतातुन पाणी गळती सुरू झाली होती, ती पालिकेने दुरुस्त करून बंद केली. यामुळे नाट्यगृहाच्या बांधकाम गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह प्रश्न उपस्थित होत असतानाच, १५ वर्षांतच डॉ. घाणेकर नाट्यगृहाच्या नूतनीकरण करण्याची वेळ आली आहे. राज्य शासनाने यासाठी तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, लवकरच दुरुस्तीची कामे सुरू होणार आहेत.
कोणती कामे केली जाणार
नूतनीकरणादरम्यान, संपूर्ण वास्तूची डागडुजी, तुटलेल्या खुर्च्यांचा बदलणे, पडदे बदलणे, शौचालये दुरुस्ती, व्हीआयपी कक्ष दुरुस्ती, कार्पेट बदलणे, सुरक्षा कॅबिन दुरुस्ती, वातानुकूलन यंत्रणेची दुरुस्ती आणि इतर तांत्रिक व अंतर्गत सुविधांची सुधारणा करणे, अशी कामे करण्यात येणार आहेत.
कोट
नाट्यगृहाचे नूतनीकरण करणे आवश्यक असल्याने हे काम हाती घेण्यात येणार आहे. या ठिकाणी कलाकार आणि नाट्य रसिकांना चांगला सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीकोनातून नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती ठाणे महापालिका उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली.