Thane Metro / ठाणे : घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी भागात रविवारी मेट्रो कामादरम्यान मेट्रोच्या उन्नत मार्गिकेवरून दोन लोखंडी राॅड रस्त्यावरून वाहतुक करणाऱ्या कारवर पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाहन चालकाने कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर येथील सुरक्षा अधिकाऱ्यावर निष्काळजी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कारवाई केली आहे.

भिवंडी येथील काल्हेर भागात राहणारे ४७ वर्षीय अमोल लाठे हे त्यांच्या ८३ वर्षीय वडिलांना कारमधून घोडबंदर येथील एका खासगी रुग्णालयात गेले होते. परंतु रुग्णालय बंद असल्याने ते घोडबंदर येथून कापूरबावडी मार्गे काल्हेर येथे परतत होते. ते कापूरबावडी येथे आले असता, अचानक मेट्रोच्या कामासाठी उन्नत मार्गावर ठेवलेले दोन लोखंडी राॅड त्यांच्या वाहनावर पडले. हे राॅड कारच्या आरशावर आणि कारच्या पुढील भागात पडल्याने मोठी दुर्घटना टळली.

या घटनेनंतर संतापलेल्या अमोल लाठे यांनी तेथील कंत्राटदार कर्मचाऱ्यांना जाब विचारला. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. रविवारी रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सुरक्षा विभागाचे अधिकारी प्रमोद मोहीते यांच्याविरोधात लाठे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम १२५ आणि ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

एमएमआरडीएकडून कारवाई

याप्रकरणात एमएमआरडीएने कंत्राटदार कंपनीविरोधात कारवाई केली आहे. कंत्राटदार कंपनीला १० लाख रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला असून उप कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे. चौकशीअंती मुख्य कंत्राटदार आणि उप कंत्राटदारांविरोधात योग्य दंडात्मक कारवाई केली जाईल तसेच वाहन मालकाला योग्य नुकसान भरपाई देण्यात येईल असे एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले.

वाहन मालकाने तात्काळ साइट सिक्युरिटीला माहिती दिली. सिक्युरिटी टीमने तत्परतेने प्रशासनाला कळवले. परिसर सुरक्षित राहावा म्हणून सिक्युरिटी टीमने लगेचच परिसर बंदिस्त केला. त्यानंतर साइट सेफ्टी टीम आणि कंत्राटदारांच्या प्रतिनिधींनी तातडीने तपासणी केली. वाहनाचे फोटो व तपशील नोंदविण्यात आले तसेच गाडीच्या मालकाला योग्य भरपाई दिली जाईल याची खात्री देण्यात आली.

रॉड नेमका कुठून आला याचा शोध घेण्यासाठी चौकशी आदेशित करण्यात आली असून सुधारात्मक पावले उचलण्याबाबत शिफारसी करण्यास सांगण्यात आले आहे. नागरिक आणि कामगारांची सुरक्षितता हीच त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. प्रत्येक घटनेवर कठोर जबाबदारी निश्चित करून, तातडीने सुधारात्मक पावले उचलून व तृतीय पक्षांकडून पुनरावलोकन करून सुरक्षा मानक अधिक मजबूत करण्यात येतात असेही एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.