शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे काल ( २६ जानेवारी ) ठाण्याच्या दौऱ्यावर होते. ठाण्यातील आरोग्य शिबीराला उद्धव ठाकरेंनी उपस्थिती लावली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. पण, आनंद आश्रम या ठिकाणी जायचं टाळलं आहे. विरोध होणार असल्याची माहिती मिळाल्यावर उद्धव ठाकरेंनी जाणं टाळलं असल्याचं बोललं जात आहे. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एबीपी माझा’शी बोलताना नरेश मस्के म्हणाले, “आनंद दिघे यांचं दर्शन घेण्यासाठी कधीही कोणाला अडवलं नसतं. उद्धव ठाकरेंना दर्शन घेण्यासाठी आमचा विरोध नव्हता. आनंद दिघे यांच्या जयंती आणि पुण्यतिथीला कधी कोणाला आठवण झाली नाही. मात्र, रक्त ओतून शिवसेनेचं काम करत असताना आनंद दिघेंचं पंख छाटण्याचं काम झालं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन एकनाथ शिंदेंनी पक्ष वाढवण्याचं काम केलं. त्यांचेही पंख छाटण्याचं काम झालं आहे. हे ठाणेकरांना माहिती असून, ते विरसले नाहीत.”

हेही वाचा : “शरद पवार भाजपाबरोबर आहेत म्हणणं…”, संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना सुनावले खडेबोल; म्हणाले…

“ठाणे शिवसेनेचा बाल्लेकिल्ला होता आणि आजही आहे. पण, तो बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या रुपात आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे ठाण्यात यायचे, तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि उत्साह प्रचंड असायचा. हजारो शिवसैनिक टेंभी नाक्यावर असायचे. पण, आता मीरा-भायंदर, डोबिंवली, अंबरनाथ पासून कार्यकर्ते बोलवण्यात आले होते. पक्षप्रमुख आल्यावर स्वागताला कार्यकर्ते नाहीत, याचं वाईट वाटलं,” असा खोचक टोला नरेश मस्केंनी उद्धव ठाकरेंना लगावला.

हेही वाचा : “महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर…”, शरद पवारांवरील ‘त्या’ विधानावरून प्रकाश आंबेडकरांना संजय राऊतांचा सल्ला

“ठाण्याने बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर प्रचंड प्रेम केलं. पहिला विजय ठाण्याने शिवसेनेला दिला. पण, बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार, हिंदुत्वाचा मार्ग सोडून काही लोकांच्या नादाला लागत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधली,” असा हल्लाबोल नरेश मस्केंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naresh maske taunt uddha thackeray over thane tour react anand dighe ssa