नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या आठ ॲाक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्धाटन होणार आहे. या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरु आहे. मुंबई महानगर प्रदेशातील हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा, प्रतिष्ठेचा प्रकल्प मानला जात आहे. मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे ८ तारखेला उद्धाटन होणार असले तरी येथून प्रत्यक्ष विमानसेवा सुरु होण्यास डिसेंबरचा अखेरचा आठवडा उजाडेल अशीच शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात या विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाण होईल असा दावा सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी लोकसत्ताशी बोलताना केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश नव्या युगात प्रवेश करणार आहे, असा दावा सिंघल यांनी केला. हे विमानतळ केवळ एक पायाभूत सुविधा नसून विकसित भारताचे प्रतीक असेल. वर्तमानात जेव्हा-जेव्हा भारतात नवनिर्मिती होते, तेव्हा संपूर्ण जग त्याची दखल घेतो. या उद्घाटनाच्या निमित्ताने राष्ट्रीय अभिमान, जागतिक मानांकन आणि भविष्यातील दृष्टीकोन या सर्वांचा संगम झालेला दिसून येईल, असेही सिंघल म्हणाले.
मुंबई महानगर प्रदेश विकासाचे केंद्र
मुंबई महानगर प्रदेशाची हवाई प्रवासाची मागणी पुढील दोन दशकांत प्रचंड वेगाने वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २०४० पर्यंत ही मागणी १५० दशलक्ष प्रवासी वार्षिक इतकी होणार आहे. सध्या कार्यरत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने अनेक दशकांपासून प्रवासीसेवा उत्तम प्रकारे पुरवली असली तरी त्याची कमाल क्षमता ५५ दशलक्ष प्रवासी वार्षिक इतकी मर्यादित आहे. त्यामुळे नवीन विमानतळाची उभारणी ही वेळेची गरज ठरली होती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मागणीसाठी केवळ उत्तर ठरत नाही, तर मुंबईला जागतिक बहुविमानतळ प्रणाली असलेल्या निवडक महानगरांच्या रांगेत उभे करते. या दोन विमानतळांमुळे मुंबई एक जागतिक विमान केंद्र बनेल आणि या प्रदेशाची अर्थव्यवस्था अधिक वेगाने वाढेल, असा दावाही सिंघल यांनी केला.
कसे असेल विमानतळ?
या प्रकल्पाचे प्रमाण आणि भव्यता विशेषत्वाने अधोरेखित करण्याजोगे आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पांपैकी एक आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी या यशस्वी मॉडेलवर तो उभारण्यात आला असून सिडकोकडे २६ टक्के आणि एनएमआयएएल कडे ७४ टक्के हिस्सा आहे. तब्बल ११६० हेक्टर म्हणजे सुमारे २८६० एकर क्षेत्रावर हे विमानतळ उभे करण्यात आले आहे. सद्यस्थितीत पहिला टप्पा दरवर्षी २० दशलक्ष प्रवासी हाताळण्याची क्षमता ठेवतो. हा फक्त प्रारंभ आहे कारण अंतिम टप्प्यात विमानतळाची प्रवासी क्षमता ९० दशलक्षांपर्यंत वाढवली जाणार असून त्याच वेळी तब्बल साडेतीन दशलक्ष टन मालवाहतूक येथे होऊ शकेल. या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे १९६४६/- कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे, तर अंतिम टप्प्यापर्यंत एकूण गुंतवणूक एक लाख कोटी रुपयांवर जाईल. या प्रकल्पाचे औपचारिक परवानेही आता पूर्ण झाले असून तीस सप्टेंबर रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला एरोड्रोम परवाना दिला आहे. त्यामुळे लवकरच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होतील अशी आशा आहे.
वैशिष्ट काय असतील ?
या विमानतळाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास ते भारताच्या आधुनिक क्षमतेचे दर्शन घडवतात. दोन समांतर धावपट्ट्या प्रत्येकी ३७०० मीटर लांबीच्या असून त्या सर्व प्रकारच्या हवामानात आणि दिवसरात्र २४ बाय ७ कार्यक्षम राहतील. त्यासाठी कॅट २ आणि कॅट ३ आयएलएस प्रणाली बसवण्यात आली आहे. विमानतळाची वास्तुरचना स्वतःमध्ये एक अद्वितीय संदेश देते. कमलपुष्पावर आधारित टर्मिनलची रचना भारतीय राष्ट्रीय ओळख अधोरेखित करते. जागतिक स्तरावर कार्यक्षम विमानतळांमध्ये स्थान मिळविण्याच्या दृष्टीने अनेक तंत्रसुविधा येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व टर्मिनल्सना जोडणारी स्वयंचलित पीपल मूव्हर प्रणाली ही एक खास वैशिष्ट्य आहे. चारही टर्मिनल्स टी१, टी२, टी३ आणि टी४ हे भूमिगत नेटवर्कद्वारे जोडले जाणार असून प्रवासी कोणत्याही टर्मिनलवर चेक-इन करू शकतील आणि त्यांचे सामान स्वयंचलितपणे दुसऱ्या टर्मिनलवर पोहोचवले जाईल. याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे मेट्रो स्थानकावरून थेट चेक-इनची सुविधा उपलब्ध असेल.
कनेक्टिव्हीटी कशी असेल ?
वाहतुकीच्या दृष्टीने हा विमानतळ महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कनेक्टिव्हिटीला नवा आयाम देतो. अटल सेतू अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंकद्वारे तो थेट मुंबईशी जोडला जाणार आहे. प्रस्तावित मेट्रो लाईन ८ अर्थात गोल्ड लाईन छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडेल, तर मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भूमिगत स्थानक असेल. भविष्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील पहिला जलपरिवहन असलेला विमानतळ ठरणार आहे. वॉटर टॅक्सीमुळे मुंबई व आसपासच्या किनारपट्टीशी थेट संपर्क साधता येईल. अशा प्रकारे रेल्वे, रस्ता, मेट्रो, समुद्र आणि हवाई या सर्व माध्यमांना एकत्र करणारा हा देशातील पहिलाच बहुआयामी विमानतळ ठरेल.