डोंबिवली: मुंब्रा, दिवा रेल्वे स्थानकातील बहुतांशी प्रवासी डोंबिवली लोकलमध्ये उलट मार्गाने प्रवास करुन नियमित डोंबिवली रेल्वे स्थानकात येतात. अगोदरच मुंब्रा, दिवा रेल्वे स्थानकातून बसून आलेल्या प्रवाशांमुळे डोंबिवली लोकल प्रवाशांनी भरलेली असते. त्यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकात डोंबिवली लोकल आल्यावर प्रवाशांना बसण्यासाठी आसने मिळत नाहीत. लोकल डोंबिवली असुनही डोंबिवलीतील प्रवाशांना प्रवास मात्र खचाखचीच्या गर्दीत, उभा राहून करावा लागत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्जत, कसारा, कल्याण, बदलापूर, टिटवाळा, अंबरनाथ या भागातून सीएसएमटीकडे सकाळच्या वेळेत जाणाऱ्या लोकल प्रवाशांनी खच्चून भरलेल्या असतात. या लोकल दिवा, मुंब्रा स्थानकात थांबा असला तरी, कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात या लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवासी प्रवास करतात. या लोकल मुंब्रा, दिवा, कळवा स्थानकात थांबतात. दरवाजातील गर्दीमुळे प्रवाशांना लोकलमध्ये चढता येत नाही. वेळेत कार्यालय गाठण्याची प्रत्येक प्रवाशाची धडपड असते. मुंब्रा, दिवा रेल्वे स्थानकातील गर्दीला कंटाळलेले प्रवासी सीएसएमटी-डोंबिवली लोकलने सकाळच्या वेळेत उलट मार्गाने डोंबिवली लोकलमध्ये आरामात बसून येतात. पुन्हा मुंबईच्या दिशेने नियमितचा प्रवास सुरू करतात. मागील काही महिन्यांपासून हा प्रकार वाढला आहे, असे प्रवाशांनी सांगितले.

हेही वाचा… ठाणे जिल्ह्यात निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांचा वरचष्मा; केंद्रीय मंत्री कपील पाटील यांची टीका

यापूर्वी डोंबिवली लोकल डोंबिवलीतील प्रवाशांना रेटारेटी न करता समाधानाने प्रवास करण्याचे मोठे साधन होते. सीएसएमटीकडून डोंबिवली स्थानकात येणारी लोकल रिकामी असल्याने प्रवासी आरामात चढून आसन मिळवून मुंबईपर्यंतचा प्रवास करत होते. आता मुंब्रा, दिवा भागातील प्रवासी डोंबिवली लोकलमध्ये बसून येत असल्याने डोंबिवलीतील प्रवाशांना बसण्यास जागा मिळत नाही. अगोदरच बसून आलेल्या प्रवाशांना उठविणे शक्य होत नसल्याने डोंबिवलीतील प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागतो, अशा तक्रारी डोंबिवलीतील प्रवाशांनी केल्या.

हेही वाचा… भूमिपूजने ५०, प्रत्यक्ष कामे तीनच; मीरा-भाईंदरमधील दोन्ही आमदारांचा विकासकामांचा देखावा? 

सुरुवातीला दिवा, मुंब्रा उलट मार्गाने येणाऱ्या प्रवाशांना विरोध करण्याचा प्रयत्न डोंबिवलीतील काही प्रवाशांनी केल्या. दररोज या प्रवाशांशी किती वाद घालणार, असा विचार करुन प्रवासी आता शांत झाले आहेत. उलट दिशेने भरुन आलेल्या लोकलमध्ये जाऊन जागा मिळाली तर बसायचे आणि अन्यथा शांतपणे उभे राहून मुंबईचा प्रवास सुरू करायचा, अशी पध्दती डोंबिवली लोकलमधील प्रवाशांनी अवलंबली आहे.

हेही वाचा… चोरीच्या तक्रारींसाठी केवळ १७ रेल्वे स्थानकांत सोय; पोलीस ठाण्यांबाहेर प्रवाशांच्या रांगा

दिवा रेल्वे स्थानकातील वाढती गर्दी विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने सकाळ, संध्याकाळच्या वेळेत दिवा लोकल सुरू करण्याचे नियोजन करण्याची मागणी रेल्वे प्रवाशांकडून केली जात आहे. रेल्वे प्रवासी संघटनांनी संध्याकाळच्या वेळेत ठाणे ते टिटवाळा, कर्जत, कसारा शटल सेवा सुरू करण्याची मागणी रेल्वेच्या वरिष्ठांकडे केली आहे.

“डोंबिवली लोकल यापूर्वी रिकामी येत असे. मागील काही महिन्यांपासून मुंब्रा, दिवा भागातून प्रवासी बसून येतात. त्यामुळे अलीकडे डोंबिवली लोकलमध्ये यापूर्वीसारखी बसण्यास आसन मिळण्याची शक्यता कमी असते. उभा राहूनच मुंबईचा प्रवास करावा लागतो.” – सामर्थ्य पत्की, प्रवासी, डोंबिवली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers from dombivli have to travel standing in a jam packed crowd in dombivli local dvr