लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: रस्ते, कचरा, खड्डे किंवा विकासाचे कोणतेही प्रकल्प असोत. ठाणे जिल्ह्यात हे प्रकल्प राबविणारे ठेकेदार अतिशय निकृष्ट पध्दतीने काम करतात. अशा निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांचा जिल्ह्यात वरचष्मा आहे, अशी टीका केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपील पाटील यांनी रविवारी येथे केली.
कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे आयोजित स्वच्छता अभियानात केंद्रीय मंत्री पाटील कल्याण मधील कार्यक्रमात सहभागी झाले होते. स्वच्छता अभियानानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. पावसाळा आला की दरवर्षी ठरलेले खड्डे, पाणी तुंबणार, नजर जाईल तिथे कचऱ्याचे ढीग, ही कामे करणारा ठेकेदार चांगला असेल आणि त्याने चांगली कामे केली तर कोणतीही नागरी समस्या निर्माण होत नाही. परंतु, ठाणे जिल्ह्यात कोणतेही विकासाचे काम, प्रकल्प असो चांगल्या दर्जाचे काम करणारा ठेकेदार मिळत नाहीत. त्यामुळे नागरी समस्या हा ठाणे जिल्ह्यातील ज्वलंत विषय बनतो, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा… भूमिपूजने ५०, प्रत्यक्ष कामे तीनच; मीरा-भाईंदरमधील दोन्ही आमदारांचा विकासकामांचा देखावा?
आपण राहत असलेल्या परिसरात नागरी विकासाची कामे सुरू झाली की त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक दक्ष नागरिकांनी एक दबाव गट तयार केला पाहिजे. सुरू असलेली कामे दर्जेदार आहेत की नाहीत याची चाचपणी या नागरिकांनी केली पाहिजे. अशा दबाव गटातून ठेकेदारावर अंकुश राहतो. कामे चांगल्या दर्जाची होतात, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत बकालपणा अजिबात सहन करणार नाही. याविषयी लवकरच एक बैठक घेऊन शहरातील नागरी समस्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना करणार आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा… चोरीच्या तक्रारींसाठी केवळ १७ रेल्वे स्थानकांत सोय; पोलीस ठाण्यांबाहेर प्रवाशांच्या रांगा
केवळ स्वच्छता पंधरवड्यामध्ये स्वच्छता अभियान न राबविता ते दररोज राबविले पाहिजे. नागरिकांनी संघटितपणे गट करुन विभागवार पालिकेला सहकार्य केले तर शहर स्वच्छ राहण्यास साहाय्य होईल. नागरिकांच्या सहभागातून पालिका शहर स्वच्छतेमध्ये अग्रस्थानी येईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
हेही वाचा… भंडार्ली कचराभूमी बंद करा अन्यथा वाहने जाळू; मनसे आमदार प्रमोद पाटील यांचा ठाणे पालिकेला इशारा
मंत्री पाटील यांच्यासोबत या स्वच्छता अभियानात अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त अतुल पाटील, माहिती विभागप्रमुख संजय जाधव, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, माजी आमदार नरेंद्र पवार, शहरप्रमुख रवी पाटील, भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील, डाॅ. प्रशांत पाटील, सामाजिक कार्यकर्त्या डाॅ. रुपिंदर कौर सहभागी झाले होते.
भिवंडी लोकसभेसाठी एक रस्ते ठेकेदार निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याने या स्पर्धकाच्या दिशेने मंत्री पाटील यांच्या बोलण्याचा रोख असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.