Tembhinaka devi, NavratriUtsav ठाणे : शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे(UddhavThackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी टेंभीनाका येथील देवीचे दर्शन घेऊन महाआरती केली. रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी टेंभी नाक्यावर शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडीच्या रणरागिणींनी तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. टेंभीनाका देवीचे दर्शन घेण्यापूर्वी त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. टेंभीनाका देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्या शहरातील ठाकरे गटाच्या चंदनवाडी शाखेजवळील देवीचे तसेच काही पदाधिकाऱ्यांच्या मंडळातील आणि घरगुती देवी च्या दर्शनासाठी गेल्या होत्या.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी जय माँ अंबे धर्मदाय संस्थेच्या माध्यमातून नवरात्रौत्सवाचे आयोजन सुरू केले. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा उत्सव पुढे सुरू ठेवला आहे. यंदा या उत्सवाचे ४८ वे वर्षे आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी या देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी येत असतात. तर, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी या देखील दरवर्षी या देवीच्या दर्शनासाठी येतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही गुरुवारी सायंकाळी त्यांनी टेंभीनाका देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती.

टेंभी नाका येथे प्रवेश करताच त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन केले. त्यानंतर त्यांनी टेंभी नाका देवीच्या मंडपात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होते. रश्मी ठाकरे यांनी यावेळी दुर्गेश्वरी देवीची खणा-नारळाने ओटी भरली आणि मनोभावे पुजा केली.

टेंभी नाका देवीचे दर्शन घेतल्यानंतर रश्मी ठाकरे यांनी ठाणे शहरातील चंदनवाडी भागात असलेल्या ठाकरे गटाच्या मुख्य शाखेजवळील देवीचे दर्शन घेतले. तिथून पुढे त्या रामचंद्र नगर येथील एका पदाधिकाऱ्याच्या नवरात्र उत्सवात त्यांनी भेटी दिली. रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी या परिसरात फलकबाजी करण्यात आली होती. तसेच त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरगुती देवीचे दर्शन घेतले. काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे ठाणे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी शिवसेना (शिंदे गटाने ) संजय राऊत यांच्या विरोधात निर्दशने केली होती. असे असतानाच, काही दिवसात टेंभी नाका देवीच्या दर्शानासाठी रश्मी ठाकरे ठाण्यात आल्यामुळे पुन्हा या दोन पक्षात राजकीय वाद होतील का अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतू असे काही झाले नाही.