कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेने चार वर्षापूर्वी मंजूर केलेल्या पालिकतील विविध पदांच्या आकृतीबंधानुसार प्रशासनाने ४९० पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. आकृतीबंधानुसार प्रशासनाने चार वर्षापूर्वी विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांची एकूण ६४० पदे मंजूर केली आहेत. ऑनलाईन प्रक्रियेतून या नोकरभरतीचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

वैद्यकीय, यांत्रिक, तांत्रिक, सामान्य प्रशासन, लेखा विभाग, क्रीडा, उद्यान, अग्निशामक, अग्निशमन सेवा यंत्रचालक अशा विविध विभागांमध्ये ही नोकर भरती केली जाणार आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या संकेतस्थळावर या नोकर भरतीची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालिकेने ऑगस्ट २०२१ मध्ये पालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांंची आवश्यकता विचारात घेऊन आकृतीबंध मंजूर केला आहे. या आकृतीबंधानुसार एकूण ६४० पदे मंजूर करण्यात आली आहेत. २०२१ ते २०३१ या कालावधीत पालिकेने ही पदे भरावयची आहेत. ही पदे टप्प्याने न भरता प्रशासनाने पालिकेतील सेवानिवृत्त झालेले कर्मचारी, त्यांच्या रिक्त जागा, पालिकेतील मनुष्यबळाची उपलब्धता याचा विचार करून ४९० पदे एकगठ्ठा भरण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाईन माध्यमातून अर्ज नोंदणीची प्रक्रिया १० जूनपासून सुरू करण्यात आली आहे. ३ जुलै अर्ज ऑनलाईन माध्यमातून सादर करण्याची मुदत आहे. या नोकर भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेची प्रवेशपत्रे उमेदवारांंना परीक्षेच्या सात दिवस अगोदर उपलब्ध होतील. परीक्षेची तारीख पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ऑनलाईन अर्ज भरताना खुल्या प्रवर्गासाठी वस्तू आणि सेवाकरासह एक हजार रूपये शुल्क, मागास आणि अनाथ प्रवर्गासाठी ९०० रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

लिपिक टंकलेखक पदासाठी ११६, अग्निशामक पदासाठी १३८, कनिष्ठ अभियंता ५८, लेखा लिपिक १६, परिचारिका ७८, उद्यान निरीक्षक ११, औषध निर्माता १४ अशी पद भरतीची विगतवारी आहे. २१ विविध विभागातील पदे भरती केली जाणार आहेत. टीसीएस कंपनीच्या माध्यमातून ही नोकर भरती आणि परीक्षेची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. तांत्रिक समस्या उद्भवल्यास इच्छुक उमेदवारांनी टीसीएस कक्षाच्या ०२२-६१०८७५१९ या क्रमांकावर, जाहिरातीसंबंधी माहितीसाठी पालिकेच्या ०२५१-२३०३०६० येथे संंपर्क साधावा. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन आयुक्त अभिनव गोयल यांनी केले आहे.

चार वर्षापूर्वी पालिकेने ६४० पदांचा आकृतीबंध मंंजूर केला आहे. या आकृतीबंधानुसार विविध विभागातील मनुष्यबळाची उपलब्धता आणि पालिकेच्या संभाव्य आर्थिक परिस्थितीचा विचार करून ही नोकरभरती वरिष्ठांच्या निर्देशानुसार ऑनलाईन माध्यमातून केली जाणार आहे. – वंदना गुळवे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग.