Ganpati Visarjan 2025 : डोंबिवली – डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यावरील दावडी हद्दीतील रिजन्सी इस्टेट गृहसंकुलांमध्ये पर्यावरणपूरक गणपती विसर्जन उपक्रम राबविण्यात आला. गृहसंकुलातील नागरिकांनी रोटरी क्लब ऑफ न्यू रिजन्सी इस्टेटतर्फे आयोजित पर्यावरणपूरक गणपती विसर्जन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मागील आठ वर्षापासून रिजन्सी इस्टेटमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी शहरातील नागरिकांना पर्यावरणस्नेही, ध्वनीप्रदूषण मुक्त, दणदणाटमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाची दखल घेऊन भाविकांनी पर्यावरणपूरक, ध्वनीप्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत डोंबिवलीतील गोळवली, दावडी हद्दीतील रिजन्सी इस्टेटमध्ये रोटरी क्लब ऑफ न्यू रिजन्सी इस्टेटने आपल्या गृहसंकुल परिसरातील नागरिकांना जलप्रदूषण टाळण्यासाठी रोटरी क्लबने तयार केलेल्या कृ्त्रिम पर्यावरणस्नेही तलावांमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन केले होते.

रिजन्सी इस्टेटमधील नागरिकांनी या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला. आणि संकुल आवारातील पर्यावरणस्नेही तलावांमध्ये गणपतीचे विसर्जन केले. ही संकल्पना प्रकल्प प्रमुख आणि माजी अध्यक्ष सचिन म्हात्रे यांनी सोसायटी व्यवस्थापना समोर मांडली. जलप्रदूषण टाळण्यासाठी शासन, सामाजिक संस्था विविध माध्यमातून प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपणही आपल्या माध्यमातून जलप्रदूषण रोखण्यासाठी करावयाचा प्रयत्न म्हणून रिजन्सी इस्टेट संकुलातील गणपती मूर्ती सोसायटी आवारात तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करू, असा निर्णय घेण्यात आला. विसर्जन टाक्यांची बांधणी करण्यात आली.

दीड दिवसांच्या गणपतींपासून गणेशभक्त या कृत्रिम तलावांमध्ये गणपतीचे विसर्जन करत आहेत. यापूर्वी गणेशभक्त गणपती मूर्ती परिसरातील तळी, नैसर्गिक प्रवाहांमध्ये गणपती विसर्जनासाठी जात होते. पण वाढते जलप्रदूषण रोखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. याची जाणीव वाढत असल्याने रिजन्सी इस्टेटमधील सर्वच नागरिक गणपती मूर्ती सोसायटी आवारातील कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करत आहेत. पर्यावरणस्नेही तळ्याच्या बाजुला भाविक गणपतीला आरती करतात. श्रध्देने मूर्ती कृत्रिम तलावाजवळ असलेल्या सोसायटीतील स्वयंसेवकांच्या स्वाधीन करतात. भक्तीपूर्ण भावाने गणपतीचे गणेशभक्तांच्या समक्ष विसर्जन केले जाते, असे सचिन म्हात्रे यांनी सांगितले.

मूर्ती शेळवल्यानंतर तयार होणारी माती पुन्हा मूर्तीकाराला परत केली जाते. काही माती झाडांच्या बुडांना खत म्हणून टाकली जाते. विसर्जन टाकीतील पाणी प्रक्रिया करून झाडांना, वाहने धुण्यासाठी वापरले जाते. मागील आठ वर्षापासून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे दावडी परिसरातील, रिजन्सी इस्टेटमधील बहुतांशी रहिवासी शाडुच्या, पर्यावरणस्नेही मूर्ती पुजेसाठी वापरत आहेत. पीओपीच्या मूर्तींचा तीन टक्के वापर दावडी, रिजन्सी इस्टेट भागात कमी झाला आहे, असे सचिन म्हात्रे यांनी सांगितले.

या उपक्रमाबद्दल पालिका आयुक्त अभिनव गोयल, पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, डाॅ. नीलेश जयवंत, कैलास जेठाणी यांनी समाधान व्यक्त केले. गणेशोत्सवापूर्वी रिजन्सी इस्टेट संकुलात शाडुच्या मातीपासून गणपती मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली होती. या उपक्रमात मुले अधिक संख्येने सहभागी झाली होती.