ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटामध्ये गेल्या काही महिन्यांपासून आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार की महायुतीत, याविषयी विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

असे असतानाच,“ठाण्याचा महापौर भाजपचा झाला पाहिजे, हिच आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आणि आमचीही भूमिका कायम राहिली आहे, असे विधान भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केले. त्याला शिवसेना (शिंदे गट) चे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले.

ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलाचे वारे वाहू लागले असून या निवडणुकीत युती आणि आघाडी होणार का, याविषयी चर्चा रंगल्या आहेत. अशातच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मोठे विधान केले आहे. ठाण्याचा महापौर भाजपचा झाला पाहिजे, हिच आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि आमचीही हीच भुमिका कायम राहीली आहे, असे मत केळकर यांनी व्यक्त केले आहे. त्याला शिवसेना ( शिंदे गट) चे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले.

केळकर काय म्हणाले होते?

ठाणे महापालिका निवडणुक युतीत लढाव्याची की नाही, याबाबतचा निर्णय ठाण्याचे प्रमुख नेते एकत्रित बसून निर्णय घेतील. परंतु कार्यकर्त्यांची भुमिका आणि इच्छा आहे की, स्वतंत्र लढले पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची भुमिका असते, तशीच आमचीही कायम भूमिका राहिली आहे की, ठाण्याचा महापौर भाजपचा झाला पाहिजे, हिच आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असे मत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले. ठाणे महापालिकेचा कारभार स्वच्छ राहावा, यासाठी मी चोकीदार म्हणून गेली कित्येक वर्षे काम करत आहे. ही लढाई निवडणुकीच्या तोंडावर नव्हे, तर आधीपासूनच लढत आहे, असे ते म्हणाले.

जनता ठरवेल महापौर कोणाचा

प्रत्येक पक्षाला वाटतं की महापौर आपला असावा, भाजपलाही तसे वाटत असेल आणि त्यांच्या दृष्टीने ती मागणी रास्त आहे. उद्या आरपीआय किंवा समाजवादी पक्षही निवडणूक लढले, तरी तेच म्हणतील की महापौर आमचा झाला पाहिजे. त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने त्यांचे म्हणणे योग्य आहे. आम्हालाही वाटत आमचाच महापौर व्हावा. परंतु जनता ठरवेल महापौर कोणाचा होणार, असे प्रत्युत्तर शिवसेना ( शिंदे गट) चे खासदार नरेश म्हस्के यांनी दिले.