ठाणे : ठाण्यात डेंग्यू-मलेरिया आजाराने डोकेवर काढले असतानाच ठाणे महापालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी उभारलेल्या कृत्रिम तलाव आणि लोखंडी कंटेनरमध्ये डासांची पैदास होत आहे. विसर्जनानंतर साचलेले दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारे ठरू शकते आहे. ठाण्यात डेंग्यू, मलेरियाचा प्रादूर्भाव असतानाच आता महापालिकेने उभारलेले हे कृत्रिम तलाव ठाणेकरांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी ठाणे महापालिकेने ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे. या कृत्रिम तलावांमध्ये १० दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते. विसर्जनानंतर तलाव व कंटेनर त्वरित रिकामे करणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे ठाण्यातील अनेक ठिकाणी पाणी दूषित झाले असून डासांची उत्पत्ती होऊ लागली आहे. ठाण्यात गेल्या काही आठवड्यांत डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत.

अशातच या टाक्यांमधील साचलेल्या पाण्यात डासांच्या आळ्या वाढू लागल्या आहेत. एकीकडे डेंग्यू, मेलेरियाच्या आजाराचा प्रादूर्भाव आणि दुसरीकडे महापालिकेडून सुरु असलेले दुर्लक्ष यामुळे ठाणेकरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

शासन आणि ठाणे महापालिकेने जर खरोखरच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साध्य करायचा असेल, तर केवळ दिखाव्यापुरत्या सुविधा न उभारता त्याची वैज्ञानिक व परिणामकारक अंमलबजावणी करण्याची गरज आहे. अन्यथा पर्यावरणपूरक या नावाखाली ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याचा ठपका येत्या काळात प्रशासनावर ठेवला जाईल. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याबाबत तातडीने पावले उचलण्याची विनंती केली आहे. – डॉ. प्रशांत सिनकर, पर्यावरण अभ्यासक ठाणे.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी ठाणे महापालिकेने केलेल्या टाकी व्यवस्थेतील पाण्यावर आल्म आणि पोटॅशियम परमॅग्नेटची प्रक्रिया केली आहे. यामध्ये साचलेले पाणी लवकरच काढले जाईल अशी माहिती ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.