ठाणे : अमली पदार्थ सेवन आणि विक्री करणाऱ्यांविरोधात ठाणे पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून यामध्ये गेल्या पाच वर्षात ठाणे पोलिसांनी अमली पदार्थाप्रकरणी १६३ गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात १४३ कोटींचा साठा पोलिसांनी जप्त केला होता. हा साठा पोलिसांनी नुकताच तळोजा भागात नष्ट केला आहे.
ठाणे, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये अमली पदार्थ विक्री आणि सेवनाचे प्रकार वाढीस लागले होते. याबाबत नागरिकांकडून पोलिसांकडे तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारीनंतर ठाणे पोलिसांनी अमली पदार्थ प्रकरणी कारवाई सुरू केली होती. गेल्या पाच वर्षात ठाणे पोलिसांनी अमली पदार्थाप्रकरणी १६३ गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात १४३ कोटींचा साठा पोलिसांनी जप्त केला होता. हा साठा ठाणे पोलिसांच्या ताब्यात होता. अमली पदार्थ नाश समितीने कायदेशीर बाबींची पूर्तता झालेल्या गुन्ह्यांतील मुद्देमाल नष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, ठाणे पोलिसांनी हा साठा नष्ट केला. ही कारवाई ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
हेरॉईन, चरस, गांजा, कोकेन, एमडी, ब्राउन शुगर, मेथामेफेटेमाईन, मेथेडाॅन, केटामाईन, एलएसडी पेपर, मॅथेक्युलिन, एक्स्टसी पिल्स असा एकूण १०६५ किलो वजनाचा साठा आणि कोडीनयुक्त कफ सिरपच्या २६ हजार ९३५ बाॅटल्स असा एकूण १४३ कोटी ५३ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. शासनाने प्राधिकृत केलेल्या नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसी येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीने हा साठा नष्ट केला.
या कारवाईसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले होते. तसेच शासकीय पंच, रासायनिक विश्लेषक यांच्या उपस्थितीत मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलिस आयुक्त डाॅ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) व मुद्देमाल समिती अध्यक्ष डॉ. पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे सदस्य पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, डॉ. श्रीकांत परोपकारी, सहाय्यक आयुक्त रविंद्र दौंडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.