ठाणे : ठाण्यात खड्डे आणि वाहतुक कोंडी यामुळे वीट आलेल्या ठाणेकरांना सोमवारी कापूरबावडी ते फाऊंटन पर्यंत ना वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. ना खड्ड्यांचा. अनेक ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले होते. तर वाहतुकही सुरळीत होती. सकाळी वाहतुकीची वेळ असतानाही नोकरदारांना खासगी वाहनाने अवघ्या पाच ते सात मिनीटांत कापूरबावडी ते कासारवडवली पर्यंतचे अंतर गाठणे शक्य झाले. दररोज याच अंतरासाठी किमान अर्धा ते पाऊण तास लागत होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज, मेट्रोच्या चाचणीसाठी ठाणे शहरात येणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने शहरातील खड्डे बुजविले, वाहतुक सुरळीत होती. जर मुख्यमंत्री येत असताना शहर वाहतुक कोंडी मुक्त आणि खड्डे मुक्त होऊ शकते. तर मागील काही महिन्यांपासून ठाण्यात होणारी वाहतुक कोंडी का सुटली नाही असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

ठाण्यातील नोकरदारांना मुंबई गाठता यावी यासाठी एमएमआरडीएकडून मेट्रो चार आणि चार अ प्रकल्पाची निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पांची कामे सध्या घोडबंदर भागातून सुरु आहे. घोडबंदर भागात पावसामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे, खड्ड्यांमुळे रस्त्याची झालेली वाईट अवस्था यामुळे घोडबंदर भागातून प्रवास करणाऱ्यांना कोंडीचा सामना सहन करावा लागतो. तासन्-तास वाहन चालक कोंडीत अडकून असतात.

ठाण्यातील वाहतुक कोंडीचा थेट परिणाम ठाणे, मिरा भाईंदर, वसई आणि भिवंडी या चार महत्त्वाच्या शहरांमध्ये बसतो. वाहतुक कोंडीमुळे ठाण्यातील नागरिक, मनसेने आंदोलनही केले. परंतु कोंडी सुटली नव्हती. दरम्यान, सोमवारी मेट्रो मार्गिकेवर मेट्रो ट्रेनची चाचणी आणि तांत्रिक बाबी तपासणी होणार आहे. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.

मुख्यमंत्री आले, ठाणेकर सुखावले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठाण्यात येणार असल्याने प्रशासनाने घोडबंदर भागातील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले. तर वाहतुक पोलीस सकाळपासूनच रस्त्यावर दिसू लागले होते. घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट, वाघबीळ, पातलीपाडा, कापूरबावडी परिसरात नेहमी वाहतुक कोंडी होत असते.

अनेकदा वाहन चालकांना अर्धा ते पाऊण तास कोंडीत वाया घालवावा लागतो. परंतु सोमवारी वाहतुक कोंडी झाली नसल्याने कासारवडवली ते कापूरबावडी हे अंतर अवघ्या पाच ते सात मिनीटांत वाहन चालकांना गाठता आले. जर मुख्यमंत्री येत असताना हे नियोजन होते. तर सर्वसामान्य नागरिक प्रवास करताना हे नियोजन का दिसून येत नाही. असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.