ठाणे : ठाण्यातील वाहतूक कोंडी, वाढती बेकायदा बांधकाम महापालिकेतील कथीत भ्रष्टाचार यासारख्या वेगवेगळ्या प्रश्नांवर शहरातील वेगळ्या पक्षांनी काढलेल्या मोर्चाला ठाणे महापालिका प्रशासनाला सामोरे जावे लागले. हातात पाण्याचे रिकामे हंडे घेऊन निघालेल्या महिला, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या जागोजागी असलेल्या प्रतिमा आणि या मोर्चाला साथ देण्यासाठी मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून आलेले शिवसेना (उबाठा) आणि मनसे नेत्यांची उपस्थिती या मोर्चात लक्षवेधी ठरली.

ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृह या परिसरातून या मोर्चाला दुपारी ४ वाजताच्या सुमारास सुरुवात झाली. शिवसेना (उबाठा) नेते भास्कर जाधव, राजन विचारे, आमदार जितेंद्र आव्हाड, मनसे नेते अविनाश जाधव कॉंग्रेसचे विक्रांत चव्हाण या सगळ्यांच्या उपस्थितीत हा मोर्चा सुरु झाला. ठाण्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवर उद्धव आणि राज या दोन ठाकरे बंधूंच्या पक्षांनी या मोर्चाची हाक दिली होती. मात्र, रविवारी रात्री उशिरा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षांनीही या मोर्चात सहभागी होण्याचे जाहीर केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने विरोधात विरोधकांची एकजूट दिसावी असा प्रयत्न यामागे होता. त्यानुसार, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही सुरुवाती पासूनच राजन विचारे, अविनाश जाधव यांच्यासोबत दिसले. या मोर्चाला कसा प्रतिसाद मिळेल याविषयी तेथील राजकीय वर्तूळात उत्सूकता होती. ठाणेकरांनी मोठ्यासंख्येने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन या पक्षांनी केले होते. मात्र, मोर्चाला झालेली गर्दी राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनीधी आणि कार्यकर्त्यांचीच अधिक होती असे दिसून आले.

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही मुंबईतील आमदार आणि कल्याण डोंबिवलीतील पदाधिकारीही या मोर्चात सहभागी झाले होते. ठाणे महापालिका मुख्यालयावरती हा मोर्चा आल्यानंतर नेत्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. नेते आयुक्तांना भेटायला गेल्यावर मात्र खालची गर्दी काहीशी पांगली असे चित्र होते.