ठाणे : ठाणे जिल्हा परिषद सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन मध्ये पार पडला. यामध्ये ५३ पैकी २७ जागांवर महिला आरक्षण जाहीर झाले आहे. अनुसूचित जाती महिलांसाठी २, अनुसूचित जमाती ७ आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ७ आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ११ जागांवर महिला आरक्षण असणार आहे.
गेल्या महिन्यात ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले.
त्यानंतर तीन ते चार दिवसांपूर्वी पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण जाहीर झाले. यामध्ये शहापूर पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी, मुरबाडचे सभापती पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी, कल्याण पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी, भिवंडीचे सभापती पद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आणि अंबरनाथ पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
त्यापाठोपाठ आता, सोमवारी ठाणे जिल्हा परिषदेच्या ५३ सदस्य (गट) साठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये ५३ जागांपैकी २७ जागांवर महिला आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यात, अनुसूचित जातीच्या तीन जागांपैकी २ जागांवर महिला, अनुसूचित जमातीच्या १३ जागांपैकी ७ जागांवर महिला, नागरिकांचा मागास प्रवर्गातील १४ जागांपैकी ७ जागांवर महिला आणि सर्वसाधारण २३ जागांपैकी ११ जागांवर महिला आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.