ठाणे : ठाणे वाहतुक पोलिसांकडून टोईंग व्हॅन वाहनाद्वारे रस्त्याकडेला बेकायदा उभ्या असणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरु झाली आहे. परंतु ठाणे पोलिसांकडून निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होत नसून वाहने उचलणाऱ्या वाहनावरील कंत्राटी कामगारांच्या पोलीस पडताळणीच्या कागदपत्रांमध्ये घोळ असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी पत्रकार परिषदेत केला. टोईंगवरील कर्मचाऱ्यांनी त्यांचे पत्ते एकाच ठिकाणावरील दिले असून एका कर्मचाऱ्याचा पत्ता बोगस आढळून आल्याचा आरोपही त्यांनी केला.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात रस्त्याकडेला बेकायदा उभ्या असणाऱ्या दुचाकींवर टोईंग वाहनाद्वारे ठाणे वाहतुक पोलिसांकडून कारवाई केली जाते. अनेकदा वाहन चालक उपस्थित असतानाही टोईंग वाहनावरील कर्मचारी वाहने उचलून नेतात. त्यामुळे वाहन चालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंगही उद्भविले होते.
सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी टोईंग वाहनाद्वारे चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या कारवाई विषयी तक्रारी केल्यानंतर ठाण्यात काही महिन्यांसाठी टोईंगची कारवाई बंद झाली होती. त्यानंतर टोईंग व्हॅनवर सीसीटीव्ही तसेच नवे मार्गदर्शक तत्त्वे तयार करुन वाहतुक पोलिसांनी टोईंगद्वारे कारवाई पुन्हा सुरु केली आहे. या कारवाई विषयी आणि टोईंग व्हॅनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांविषयी अजय जया यांनी आक्षेप घेताल आहे. बुधवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन वाहतुक शाखेच्या कारवाई विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जया यांनी दावा केला की, टोईंग वाहनावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे चारित्र्य पडताळणी आणि पोलीस पडताळणीमध्ये गैरप्रकार उघडकीस आले आहेत.
घोळ नेमका काय ?
अजय जया यांनी दावा केला की, त्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळविलेल्या माहिती नुसार अनेक कामगारांनी वास्तव्याचा पत्ता एकच दिला असून काहींनी अपूर्ण पत्ते दिल्याने त्यांची पडताळणी करणे अशक्य ठरली. उदाहरणार्थ, सलीम पठाण नावाच्या कामगाराचा पत्ता लोकमान्य नगर येथील एका इमारतीत दाखविण्यात आला आहे.
मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी दुसरी व्यक्ती कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहे. त्याचप्रमाणे, कोपरी परिसरात दाखवलेले पत्ते पूर्णतः बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून, कसारवडवली येथे आठ जणांचा पत्ता एकच, तर मुंब्रा–कौसा येथे सात जणांचा पत्ता एकाच ठिकाणी दाखवण्यात आल्याचे समोर आले आहे.
नागरिकांच्या आंदोलनानंतर वाहतूक विभागाने टोईंग वाहनावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आणि सर्व मार्गदर्शक तत्त्वांच्या नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी झाली नाही, उलट या संपूर्ण प्रक्रियेतून मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या सर्व घटनांमधून हे स्पष्ट होते की मोठ्या प्रमाणावर बनावट चारित्र्य पडताळणीची कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. पोलीस पडताळणी ही प्रामुख्याने संबंधित व्यक्तीचा पत्ता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी केली जाते, मात्र खोटे पत्ते वापरून अनेक कामगारांच्या खरी ओळख आणि त्यांच्या पार्श्वभूमीवरील गुन्हे झाकले गेले असावी असा संशय आहे. – अजय जया, सामाजिक कार्यकर्ते.
