ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून ठाणे शहर पोलीस दलात प्रतिक्षेत असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या अखेर झाल्या आहेत. इतर जिल्ह्यातून आलेले पोलीस अधिकारी आता ठाणे पोलीस दलात रूजू होणार आहेत. तर ठाणे शहर पोलीस दलातील ३३ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या देखील करण्यात आल्या आहेत. ठाणे शहर पोलीस दलातील नारपोली, मानपाडा या पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पोलीस ठाण्यात दहशदवादी विरोधी पथक आणि नागपूर शहर पोलीस दलातील अधिकारीच्या नेमणूक झाल्या.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले असून सोमवारी ठाणे पोलीस आयुक्तालयात इतर जिल्ह्यातून हजर झालेल्या पोलीस निरीक्षकांना अखेर त्यांच्या नेमणूकीच्या ठिकाणी नियुक्ती मिळालेली आहे. राज्य पोलीस नियंत्रण कक्षातील प्रियतमा मुठे यांची कासारवडवली पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.

मरोळी येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे मारूती आंधळे यांची खडकपाडा पोलीस ठाण्यात, म.सु.प.चे समाधान पाटील यांची निजामपूरा पोलीस ठाण्यात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माधवी राजेकुंभार यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा, महामार्ग सुरक्षा पथकाचे प्रफुल्ल जाधव यांची पोलीस आयुक्त यांचे वाचक, पुणे शहर पोलीस दलातील शब्बीर सय्यद यांची अंबरनाथ पोलीस ठाणे, दहशतवादी विरोधी पथकाचे आनंदा पाटील यांची नारपोली पोलीस ठाण्यात, नागपूर शहरच्या मनीषा वर्पे यांची मानपाडा पोलीस ठाण्यात, मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील राजेंद्र खेडकर यांची डोंबिवली पोलीस ठाणे, मुंबई शहरचे अतुल आहेर यांची शहर वाहतुक शाखा, नाशिक शहर पोलीस दलातील विक्रम मोहीते यांची भिवंडी शहर पोलीस ठाणे, मुंबई शहर पोलीस दलातील लक्ष्मण राठोड, राहुल सोनवणे, विठ्ठल चौगुले आणि शिवानंद देवकर यांची अनुक्रमे वागळे इस्टेट पोलीस ठाणे, सायबर पोलीस, कापूरबावडी पोलीस आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.

अंतर्गत बदल्यांचे आदेश

काही पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या देखील झाल्या आहेत. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सतिशचंद्र राठोड यांची गुन्हे अन्वेषण शाखा, हिललाईन पोलीस ठाण्याचे अनिल जगताप यांची विशेष शाखा, कापूरबावडी पोलीस ठाण्यात संदीप धांडे यांची वर्तकनगर, उल्हासनगर पोलीस ठाण्याचे चंद्रहार गोडसे यांची विठ्ठलवाडी, शहरवाहतूक शाखेचे आप्पासाहेब जानकर यांची विशेष शाखा, नियंत्रण कक्षाचे सुनील पुंगळे यांची निजामपूरा, शहर वाहतुक शाखेचे सुधाकर खोत यांची विशेष शाखा, शहर वाहतुक शाखेचे भारत चौधरी यांची ठाणेनगर, अंबरनाथ पोलीस ठाण्याचे किशोर शिंदे यांची बदलापूर पश्चिम, नौपाडा पोलीस ठाण्याचे शंकर कुंभार यांची मुंब्रा पोलीस ठाणे, नारपोली पोलीस ठाण्याचे प्रमोद कुंभार यांची भोईवाडा, भोईवाडा पोलीस ठाण्याचे संदीप रासकर यांची भिवंडी शहर, गुन्हे अन्वेषण शाखेचे श्रीकांत सोंडे यांची शहर वाहतुक यासह अशा ३३ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदली झाली आहे.

भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोदामे आहेत. तर मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बार, रेस्टाॅरंट आहेत. त्यामुळे या दोन पोलीस ठाण्यात बदली व्हावी यासाठी अनेक पोलीस अधिकारी प्रयत्न करतात. येथील नारपोली पोलीस ठाण्यात दहशदवादी विरोधी पथकाचे आनंदा पाटील आणि मानपाडा पोलीस ठाण्यात नागपूर शहरच्या मनीषा वर्पे यांची नेमणूक झाली आहे.