Tulja Bhavani Mandir, Marathwada floods 2025 / ठाणे : महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेती उध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी ठाण्यातील पंचपाखाडी येथील श्री तुळजाभवानी मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागात गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतजमिनी वाहून गेल्या, पिके नष्ट झाली तर काही भागात शेतकऱ्यांचे संसारच उद्ध्वस्त झाले. या संकटातून शेतकऱ्यांना मानसिक व आध्यात्मिक आधार मिळावा, त्यांच्या उन्नतीसाठी प्रार्थना व्हावी यासाठी ठाण्यातील पंचपाखाडी येथील श्री तुळजाभवानी मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

महाआरती कुठे आणि कधी

ही महाआरती येत्या बुधवार, १ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता होणार असून या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. या महाआरतीत मोठ्या संख्येने भाविक, स्थानिक नागरिक तसेच सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

म्हणून महाआरती

श्री तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाते. संकटसमयी भक्त आपल्या अडचणी तिच्या चरणी मांडतात. शेतकरी वर्गाचे दुःख दूर व्हावे, त्यांच्या शेतात पुन्हा भरघोस पीक यावे, कर्जाचे ओझे हलके व्हावे या हेतूने ही महाआरती आयोजित करण्यात आली आहे. उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना संकटातून बाहेर पडण्याची ताकद मिळावी यासाठी श्री तुळजाभवानीकडे यावेळी प्रार्थना करण्यात येणार आहे.