ठाणे – मराठीचा मुद्दा राज ठाकरेंच्या भाषणात दिसून आला. परंतू, उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळाव्यातून केवळ राजकारण केले. उद्धव ठाकरेंच्या भाषणात नेहमीप्रमाणे टोमणे पाहयला मिळाले असा टोला ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी लगावला.
वरळीत पार पडलेल्या ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्याच्या चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात तसेच राजकीय स्तरावर होऊ लागल्या आहेत. १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र दिसल्यामुळे विविध स्तरातून तर्क वितर्क लावले जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. हा विजयी मेळावा पार पडताच एकनाथ शिंदेच्या एक्स अकाऊंट वर एका भावावर स्तुती सुमने, तर दुसऱ्यावर जहरी टीका केल्याचे दिसून आले. त्यातच आता, ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी देखील या विजयी मेळाव्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नरेश म्हस्के म्हणाले, हा विजयी मेळावा मराठी अस्मितेसाठी होता. परंतू, मराठी हा मुद्दा केवळ राज ठाकरे यांच्या भाषणातून दिसून आला. उद्धव ठाकरेंच्या भाषणात नेहमीप्रमाणे नटदृष्ट आणि टोमणे पाहायला मिळाले. पुन्हा सत्ता आणण्यासाठी आता, राज ठाकरे यांची गरज आहे, असेच उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून दिसले. त्यामुळे मराठी भाषा संदर्भात जी काही जाहिरातबाजी केली होती ती खोटी ठरली. केवळ महापालिका निवडणूकांकरिता मराठी मुद्दा तापवणे आणि मराठी माणसाला भडकावणे असाच मुद्दा उद्धव ठाकरे यांच्या भाषणात दिसला,अशी टीका म्हस्के यांनी केली. दोघा भावांना एकत्र येण्यापासून कोणी अडवलेल नाही. शेवटी त्यांची इच्छा आहे. परंतू, उद्धव ठाकरे यांचे वागण बघता या सगळ्या गोष्टी शक्य होतील असे मला वाटत नाही, अशी सुचक प्रतिक्रिया म्हस्के यांनी दिली.