ठाणे : अनंत तरे म्हणाले होते हा माणूस एक दिवस दगा देईल आणि तेच झाले. कधी कधी निष्ठेचे मुखवटे लावून काहीजण आपल्या भोवती अनेकजण फिरत असतात, त्यामुळे नकळत त्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आता घालीन लोटांगण करुन ‘वाचवा-वाचवा’ असा हंबरडा फोडणारी माणसे आज दिसली नसती, त्यावेळी तरेंचे ऐकले असते तर पश्चाताप झाला नसता, अशी कबुली उद्धव ठाकरे यांनी दिली.

शिवसेनेचे उपनेते दिवंगत अनंत तरे यांच्या जीवनावर आधारित अनंत आकाश अर्थात आठवणीतले अनंतर तरे या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. हा सोहळा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडला. यावेळी खासदार अरविंद सावंत, माजी खासदार राजन विचारे, अनंत तरे यांचे कुटुंबिय तसेच आगरी-कोळी समाजातील नेते उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी एक गौप्यस्फोट केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, २०१४ मध्ये शिवसेना-भाजपची युती ठरली होती. सर्व काही ठरले होते. जागावाटप जवळपास पूर्ण झाला होता. अर्ज भरण्यासाठी एकदिवस असतानाच अचानक भाजपकडून युती तोडली गेली. शिवसेना प्रमुख २०१२ मध्ये आपल्यातून गेले होते आणि २०१४ ची निवडणूक. करायचे काय, लढायचे कसे? आणि तेव्हाच भाजपने शिवसेनेला संपविण्याचा डाव आखला होता. आपण लढलो, उमेदवार उभे केले. त्याचवेळी तरे यांनी अपक्ष अर्ज भरला होता आणि ते ऐकायला तयार नव्हते. आताचे जे आहेत, लोटांगणवीर ते आले आणि ते म्हणाले काहीही करा साहेब, ही जागा जाणार… त्यानंतर मी तरेंशी बोललो. त्यांना म्हणालो एकतर भाजप आपल्याला संपवायला निघाला आहे. आता समजून घ्या.. सर्वांनी मिळून हे संकट दूर करूया…

ठाकरे यांच्या दाव्यानुसार काय म्हणाले अनंत तरे?

ठाकरे यांच्या दाव्या नुसार, अनंत तरे मला भेटले त्यावेळी त्यांनी मला सांगितले की, हाच उद्या आपल्याला दगा दिल्याशिवाय राहणार नाही. पण मी म्हणालो तुम्ही सगळे असताना तो कसा दगा देईल. पण जे घडायला नको होते तेच घडले. आज अनंत तरे असते तर हे कावळे फडफडले नसते. काहीजण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सांगत असतात. कधी कधी निष्ठेचे मुखवटे लावून काहीजण आपल्या भोवती फिरत असतात, आपल्याला ते कळतही नाही. त्यावेळेस तरेंचे ऐकले असते तर, आज पश्चात्ताप झाला नसता, अशी कबुली उद्धव यांनी दिली.