कल्याण – मुंबई-नाशिक महामार्गावरून मुंबई – नागपूर समृध्दी महामार्गाला जाण्यासाठी, तसेच, डोंबिवलीतून माणकोली पुलाने मुंबई-नाशिक महामार्गावर जाण्यासाठी आवश्यक ठिकाणी असलेल्या बोगद्यांची कामे वेगाने सुरू आहेत. ही कामे येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे ठेकेदार कंपनीच्या नियंत्रक अभियंत्याने सांगितले.
डोंबिवलीतून मोठागाव माणकोली उड्डाण पूल मार्गे मुंंबई नाशिक महामार्गला जाताना गेल्या तीन वर्षापासून प्रवाशांना माणकोली गावाबाहेरील वळण रस्त्यावरून जावे लागते. काही वाहन चालक लोढा गृहसंकुलाकडून सरळ मार्गाने वोवेली, भादवड गावाजवळून अरूंद मार्गिकेतून मुंबई नाशिक महामार्गावर जाण्याचा प्रयत्न करतात. अलीकडे माणकोली पुलावरून जाणाऱ्या प्रवाशांना माणकोली गावाबाहेरील रस्ता आणि वोवेली जवळील बोगद्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणावरून महामार्गावर जाता येते.
डोंबिवलीतून मुंबई नाशिक महामार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना आणि नाशिक, मुंबईकडून डोंबिवलीत येणाऱ्या प्रवाशांना माणकोली पूल उड्डाण पूल मार्गे येण्यासाठी एमएसआरडीसीच्या नियंत्रणाखाली माणकोली जवळील वोवेली, भादवड गाव हद्दीतून जाणाऱ्या मुंबई नाशिक महामार्गाखाली बोगदा तयार करण्याचे काम गेल्या वर्षी सुरू केले आहे. याठिकाणी महामार्गाच्या एका बाजुला शंभर फूट उंचीचा डोंगर आहे. महामार्गाच्या दुसऱ्या बाजुला डोंंबिवलीकडून येणारा विस्तारित काँक्रीटचा रस्ता आहे.
महामार्गाखालून हा बोगदा वोवेली, भादवड गाव हद्दीत पूर्ण झाला की मुंबई, ठाणे शहराकडून येणारी डाव्या मार्गिकेतील वाहने वोवेली गाव येथे बोगद्याजवळ उजवे वळण घेऊन बोगद्यातून माणकोलीने दिशेने येतील. डोंबिवलीतून माणकोली मार्गे जाणारी वाहने बोगदा पूर्ण झाल्यानंतर माणकोली गावातून न जाता वोवेली गावाजवळील महामार्गाखालील बोगद्यात डावे वळण घेऊन मुंबईच्या दिशेने जातील. नाशिक, शहापूर, भिवंडीकडून येणारी वाहने बोगद्यात डावे वळण घेऊन डोंबिवलीकडे येतील. यामुळे महामार्गावर डोंबिवलीकडे येणाऱ्या, जाणाऱ्या वाहनांना प्रवेश देताना मुख्य महामार्गावरील वाहनांना अडथळा न होता वाहतूक सुरळीत राहणार आहे.
यापूर्वी हा बोगदा खर्चिक म्हणून रद्द करण्यात आला होता. भविष्यकालीन वाहनांची वाढती संख्या विचारात घेऊन हा बोगदा प्राधिकरणाने मंजूर केला. या बोगद्याच्या पाया उभारणीसाठी महामार्गालगतचा दोन्ही बाजुचा खडक फोडण्याची आणि बोगद्यासाठी मार्गिका बांधण्याची कामे वेगाने सुरू आहेत.
समृध्दी प्रवेशव्दार बोगदा
मुंबई नाशिक महामार्गावरून डोंबिवलीत येणाऱ्या, जाणाऱ्या वाहनांसाठी बोगदा उभारणीचे काम सुरू आहे. तशाच पध्दतीने वडपे गाव शांग्रिला रिसाॅर्ट भागात मुंबई नाशिक महामार्गावर भुयारी बोगदा उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. मुंबई नाशिक महामार्गावरून समृध्दी महामार्गाला वडपे हद्दीतून जाताना महामार्गावरील वाहनांना समृध्दीवरील वाहनांचा अडथळा नको म्हणून वडपे येथे बोगदा उभारणीचे काम सुरू आहे.
हा बोगदा नसल्याने आता समृध्दी महामार्गावरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांमुळे वडपे गावाजवळ मुंबई नाशिक महामार्गावर कोंडी होत आहे. या बोगद्याची उभारणी झाली की मुंबईकडून नाशिककडे जाणारी आणि नाशिककडून मुंबईकडे येणारी वाहने वरून निघून जातील. या दोन्हीकडील ज्या वाहनांना समृध्दी महामार्गावरून जायचे आहे. ती वाहने वडपे हद्दीतील महामार्गाखालील बोगद्यातून समृध्दी महामार्गाच्या दिशेने जातील. समृध्दीकडून येणारी वाहने बोगद्यातून वळण घेऊन ठाणे दिशेने, नाशिक दिशेने निघून जाणार आहेत.