रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तब्बल १८ वर्षानंतर पहिल्यांदाच आयपीएलमध्ये विजय मिळवला आणि ट्रॉफीवर आपले नाव कोरले. मंगळवारी रात्री अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पंजाब किंग्जचा सहा धावांनी पराभव केला. २००८ मध्ये आयपीएलला सुरुवात झाल्यापासून विराट कोहली बंगळुरूकडून खेळत आहे. यापूर्वी तीन वेळा अंतिम फेरी गाठणाऱ्या बंगळुरूला जेतेपदाने हुलकावणी दिली होती. मात्र, यंदा त्यांनी दमदार कामगिरी करत पहिल्या जेतेपदाला अखेर गवसणी घातली आहे.

रॉयल चॅलेंजर्सच्या विजयाचा जल्लोष देशभरात सुरू आहे. सोशल मीडियावर या विजयानंतर भावूक झालेला विराट कोहली, पत्नी अनुष्काबरोबरचा भावूक क्षण, रॉयल चॅलेंजर्स संघाने ट्रॉफी उचलताना क्षण, विजयनंतर आनंदाने नाचनाचा क्षण…दाखवणारे कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बंगळुरूमध्ये रस्त्यावर उतरून लोकांनी इतका जल्लोष केला ती गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. पुण्यातही एफसी रस्त्यावर उतरून विजयाचा जल्लोष साजरा केला. दरम्यान एक व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

सोशल मीडियावर एका चिमुकल्या आरसीबी चाहत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आरसीबीच्या विजयानंतर आपल्या भावना व्यक्त करताना तो दिसत आहे. व्हिडीओमध्ये आनंद व्यक्त करताना तो म्हणतो की, मला खूप आनंद होत आहे कारण आम्ही (आरसीबी चाहते) ही ट्रॉफी मिळविण्यासाठी १७ वर्षे वाट पाहत होतो.


चिमुकल्याच्या चेहऱ्यावर फक्त आनंद दिसत आहे. एएनआयने हा व्हिडिओ अधिकृत एक्स खात्यावर शेअर केला आहे.
व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”पाहा बंगळुरू, कर्नाटक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांचे पहिले आयपीएल जेतेपद जिंकले; एक तरुण चाहता म्हणतो, “मला खूप आनंद होत आहे कारण आम्ही (आरसीबी चाहते) ही ट्रॉफी मिळविण्यासाठी १७ वर्षे वाट पाहत होतो…”

दरम्यान, चिमुकल्याचे वय १२ ते १४ दरम्यान असेल तो १७ वर्ष ट्रॉफीची वाट पाहत असल्याचे सांगत असल्याचे पाहून अनेकांना हसू आवरता आले नाही. व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, १० वर्षाचा चिमुकला १८ वर्ष वाट पाहत आहे. तसेच हसणारे इमोजी शेअर केले आहेत.

दुसरा म्हणतो, “चिमुकला मागच्या जन्माबद्दल सांगत आहेत.”

तिसरा म्हणाला की, “हा मुलगा १७ वर्षांचा आहे”

चौथ्याने लिहिले की, हा मुलगा जो स्वत: १२ वर्षांचा आहे तो १७ वर्ष वाट पाहतोय…”

पाचव्याने लिहिले की, “चिमुकल्याला दुसरा जन्म घ्यावा लागला”

सहाव्याने कमेंट केली की,”खरा आरसीबी चाहता, त्याचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे तरी त्याने १८ वर्ष विजयाची वाट पाहिली.