Shocking Video: सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय. उत्तर प्रदेशातील गोमतीनगर येथे रस्त्याच्या मधोमध एका महिलेला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या चर्चात आहे. नेमकं काय घडलंय जाणून घेऊ या…

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काही पुरुष एका महिलेला सार्वजनिकपणे मारहाण करताना दिसतात, तर आजूबाजूचे लोक फक्त बघत आणि मोबाईलवर व्हिडिओ काढताना दिसतायत. दोन पुरुष तिच्यावर जबरदस्ती करताना दिसतात. त्यानंतर तो तिची ओढणी ओढत असून, तिचा हात पकडून तिला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. पण यूपी पोलिसांनी ही घटना ‘कौटुंबिक वाद’ असल्याचे सांगितले आणि व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मारहाणीबद्दल काहीही स्पष्टीकरण दिले नाही. लोकांनी पोलिसांच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.

लखनौ पोलिसांनी सांगितले, “३ नोव्हेंबर २०२५ रोजी कौटुंबिक वादामुळे ती महिला रागाने घराबाहेर गेली होती. व्हिडिओमध्ये त्या महिलेला तिचा भाचा घरी जाण्याची विनंती करताना दिसतो.” पोलिसांनी पुढे सांगितले की, भाच्याने समजावून सांगितल्यानंतर ती महिला कुटुंबासोबत परत घरी गेली. पोलिसांच्या उत्तरात असेही म्हटले आहे, “सोशल मीडियावर केलेले इतर आरोप खोटे आणि आधारहीन आहेत.”

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ @Pushpendra_MP_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “हा आहे उत्तर प्रदेशचा नवा “रामराज” मॉडेल जिथे रस्त्याच्या मधोमध मुलीची इज्जत आणि सुरक्षिततेचा थेट तमाशा चालतो, आणि मुख्यमंत्री साहेबांचं सिस्टीम फक्त डेटा आणि ग्राफच्या ट्वीटमध्ये व्यस्त असतं. लखनऊच्या गोमतीनगरसारख्या ठिकाणी जर मुलीची सुरक्षा अशा प्रकारे उघडपणे चिरडली जात असेल, तर गाव-खेड्यांमध्ये काय परिस्थिती असेल, ते स्वतः विचार करा. मुख्यमंत्री साहेब, हेच का तुमचं “सुरक्षित उत्तर प्रदेश”? राज्यात गुन्हेगार घाबरत नाहीत… पण सामान्य जनता घाबरते.” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकाने कमेंट करत लिहिलं, “हे ‘रामराज’ नाही, तर भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण आहे. जेव्हा लखनऊमध्ये मुलीची सुरक्षा अशा उघडपणे धोक्यात येते, तेव्हा विचार करा, गावं आणि छोट्या शहरांमध्ये काय परिस्थिती असेल?” तर दुसऱ्याने “उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यांच्या समोर एका मुलीची छेडछाड होत आहे, आणि योगी आदित्यनाथ मात्र बिनधास्तपणे म्हणतात की महिलांची सुरक्षा कडक आणि मजबूत आहे?” अशी कमेंट केली. तर एक कमेंट करत म्हणाला, “तिथे उभे असलेले लोक माणूस नाहीत, तर मातीचे पुतळे आहेत.”