most beautiful indian railway routes you must visit in india : भारत विविधता, संस्कृती यांच्याबरोबरीने त्याच्या सौंदर्यासाठीदेखील ओळखला जातो. भारतात अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणं आहेत जिथे गेल्यानंतर मन शांत होते, आपण कुठल्या वेगळ्यात सुंदर जगात आल्याचा भास होतो. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारतातील अनेक शहरे आणि राज्ये आहेत, जी आपल्या निसर्गसौंदर्याने लोकांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे जगभरातील लोक दरवर्षी या पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी येत असतात. विशेष म्हणजे आपल्या देशात असे काही सुंदर रेल्वेमार्गही आहेत; जेथून गेल्यानंतर अनेकदा पृथ्वीवर स्वर्ग पाहिल्याचा आनंद मिळतो. हिरवीगार जंगले, उंचच उंच पर्वतरांगा, बॅकवॉटर आणि दऱ्याखोऱ्यांमधून जाणारे रेल्वेमार्ग पर्यटकांना भुरळ घालतात. त्यामुळे आज आपण भारतातील पाच सर्वांत सुंदर रेल्वेमार्गांबद्दल जाणून घेणार आहोत; जिथे तुम्ही आयुष्यात एकदा तरी भेट दिलीच पाहिजे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकण रेल्वे (मुंबई-गोवा)

कोकण रेल्वेमार्गावर तुम्ही संपूर्ण प्रवासात अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य अनुभवू शकता. कोकण रेल्वेचा विस्तार मुंबईमार्गे मंगळुरूपर्यंत झाला आहे. हा रेल्वेमार्ग कोकण किनार्‍यावरून जातो. त्यामुळे मुंबई ते गोवा येईपर्यंत तुम्हाला अरबी समुद्र आणि पश्चिम घाटाचे इतके सुंदर व विलोभनीय दृश्य पाहायला मिळते की, जे तुम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही. हा रेल्वेमार्ग हिरवीगार जंगले आणि सुंदर नद्यांमधून जातो. त्यामुळे तुम्हाला वाटेत मोठमोठ्या पर्वतरांगा, अनेक आश्चर्यकारक वळणे, नदीचे पूल, तलाव व धबधबे असे निसर्गाच्या सुंदर ठेव्यांचे दर्शन घडते.

फिरायला जाण्यासाठी हॉटेल रूम बुक करताय? मग जरा थांबा, आधी ‘हा’ VIDEO पाहा, मग करा बुकिंग

दार्जिलिंग हिमालयन रेल्वे (नवीन जलपाईगुडी-दार्जिलिंग)

युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या या नॅरोगेज रेल्वे ट्रॅकवरून प्रवास करताना भान हरपून जायला होते. या सुंदर राइडचा आनंद घेण्यासाठी जगातील विविध भागांतून लोक दार्जिलिंगमध्ये येतात. ही टॉय ट्रेन सुंदर पर्वतांमधून जाते; जिथे कांचनजंगा पर्वताची अद्भुत दृश्ये पाहता येतात. चहाच्या बागा पाहण्याची सुंदर संधी मिळते. येथील आल्हाददायक वातावरण आणि तितकाच सुंदर निसर्ग पाहून येथील टॉय ट्रेनने पुन्हा पुन्हा प्रवास करण्याचे मन होते.

हिमालयीन राणी (कालका-शिमला)

कालका ते शिमला हा रेल्वेमार्ग तुम्हाला सर्वांग सुंदर प्रवासाची अनुभूती देईल. हा अविश्वसनीय प्रवास सुमारे पाच तास चालतो. त्यादरम्यान २० रेल्वेस्थानके, ८०० पूल, १०३ बोगदे व ९०० वळणे पार करून आपण शिमल्यात पोहोचतो. या रेल्वेमार्गावरून प्रवास करताना सुंदर, अविस्मरणीय असे निसर्गसौंदर्य अनुभवण्यास मिळते. या मार्गावर सुंदर दऱ्या आणि हिरवीगार जंगले असल्याने पर्यटकांना कालका-शिमला हा रेल्वेमार्ग नेहमीच भुरळ घालतो.

कांगडा व्हॅली रेल्वे (पठाणकोट-जोगिंदरनगर)

कांगडा व्हॅली रेल्वे भारतातील सर्वोत्तम रेल्वेपैकी एक असू शकते. या मार्गावरून प्रवास केल्यावर तुम्हाला धौलाधर पर्वतराजीचे सुंदर दृश्य अनुभवण्याची संधी मिळेल. भारतातील या सर्वांत सुंदर रेल्वेमार्गावर तुम्ही एकदा तरी प्रवास केलाच पाहिजे.

वाळवंटातील राणी (जैसलमेर-जोधपूर)

जसे आपण जाणतो की, भारतातील प्रत्येक शहराची आणि राज्याची स्वतःची अशी वेगळी ओळख आणि सौंदर्य असते. जैसलमेर ते जोधपूर रेल्वेमार्ग हे असेच एक ठिकाण आहे, जिथे तुम्हाला ओसाड वाळवंट जमीन, वाळूचे ढिगारे, वाळवंटातील वन्यजीव आणि आदिवासींचे सुंदर दृश्य पाहायला मिळेल. हा रेल्वेमार्ग राजस्थानच्या थार वाळवंटातील कोरड्या जंगलातून आणि ओसाड जमिनीतून जातो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Travel tourism five most beautiful indian railway routes you must visit 5 most beautiful train journeys in india that are worth taking sjr