भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये सध्या मराठी विरुद्ध अमराठी असा कृत्रिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या वादाला स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांचे समर्थन असल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीने केला आहे. यासंदर्भात समितीने पोलिसांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे.
मिरा-भाईंदर हे महाराष्ट्रातील शहर असून येथील स्थानिक भाषा मराठी आहे. त्यामुळे मराठी भाषेची सक्ती असणे स्वाभाविक आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत अमराठी नागरिकांची संख्या वाढल्यामुळे मराठी भाषेला आणि मराठी नागरिकांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.यात मराठी व्यक्तींना सदनिका नाकारणे, त्यांच्यावर खाण्याचे निर्बंध लादणे व इतर गोष्टीचा यात समावेश आहे.हे प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे मराठी माणसाला आपली गळचेपी होत असल्याचे जाणवू लागले आहे. परिणामी, मराठी माणूस आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मराठी भाषेच्या वापरावर अधिक भर देत आहे.
यामुळे राज्यभरातून मराठी-अमराठी वादासारखी प्रकरणे समोर येत आहेत. परंतु, या परिस्थितीचा राजकीय स्वार्थासाठी काही नेते गैरफायदा घेत असल्याचेही समितीने सांगितले. विशेषतः मिरा-भाईंदरमध्ये बहुसंख्येने असलेल्या गुजराती आणि मारवाडी मतदारांना मराठी समाजाविरोधात भडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
अलीकडे एका दुकानदार आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये मराठी भाषेवरून वाद झाला होता. मात्र, आमदार नरेंद्र मेहता यांनी या प्रकरणाला समाजमाध्यमांवर “गुजराती-मारवाडी विरुद्ध मराठी” असा रंग दिला, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि मराठी भाषेचा अवमान होऊ नये म्हणून समितीच्या प्रतिनिधींनी पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे.
“मिरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांनीच मोर्चा काढला होता. भाजप पक्ष अशा कोणत्याही गोष्टीत गुप्तपणे सहभागी होत नाही. मराठी भाषेचा सन्मान झाला पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. तसेच शहराच्या विकासात सर्व समाज योगदान देत आहेत. – “नरेंद्र मेहता- आमदार मिरा भाईंदर.
संजय निरूपम दुकानदाराच्या भेटीला
मनसे पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झालेल्या जोधपूर स्वीट्स या दुकानाचे मालक बाबूलाल चौधरी यांची भेट शिवसेना नेते संजय निरुपम यांनी शुक्रवारी घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना व्यापाऱ्यांच्या बाजूने असून त्यांचा पाठिंबा असल्याचे सांगितले. तसेच, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे आणि त्यामुळेच ते अशा प्रकारे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.