वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ससुपाडा येथील प्रीतम ढाबा ते नवीन वर्सोवा पूलदरम्यानच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे सतत वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने नागरिकांनी महामार्ग रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाच्या पूर्वीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वसईच्या पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद महामार्ग गेला आहे. पण या महामार्गावरील  ससुपाडा येथील प्रीतम ढाबा ते नवीन वर्सोवापुला दरम्यानच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच या खड्ड्यामुळे वाहतूक सेवेवर परिणाम होऊन प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत होती.

कोंडीमुळे शाळकरी विद्यार्थी, नोकरदार नागरिक, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होत आहे. पण याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केले असल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शनिवारी स्वखर्चाने खड्डे बुजवा आंदोलन व महामार्ग रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

या आंदोलनामुळे मुंबई, ठाणे या ठिकाणी जाणारी वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता होती. त्यापूर्वीच नायगाव पोलीस व महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व भूमिपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील व ग्रामस्थ यांची बैठक घेतली. याच दरम्यान महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने खड्डे बुजविण्याचे काम सुरू करू असे आश्वासन दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी सामंजस्य दाखवत आंदोलन स्थगित केले.

शनिवार सकाळ पासून महामार्गावर प्रामुख्याने जुना वर्सोवा, प्रीतम ढाबा, ससूनवघर अशा भागात खड्डे बुजविले जात असल्याचे महामार्ग प्राधिकरणाने सांगितले आहे.