वसई : अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात विरारच्या बोळींज पोलिसांना यश आले आहे. एकाच गुन्ह्यात पोलिसांनी १२ अमली तस्कर आरोपींना अटक केली आहे. यात एका नायजेरियन महिलेचा ही सहभाग आहे. यात अटक करून त्यांच्याकडून ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विरारच्या बोळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ मे रोजी विरारच्या म्हाडा परीसरात अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली होती. मात्र यात अन्य ही तस्कर सहभागी असण्याची शक्यता असल्याने बोळींज पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला होता. या गुन्ह्यात मिरारोड येथून ३, नालासोपारा ३, विरार २, ठाणे १, काशीमिरा १, नायगाव १ आणि मुंबई दिंडोशी १ असे एकूण १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात दोन महिलांचा समावेश असून यातील एक महिला नायजेरियन आहे तिच्यावर यापूर्वी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या अटक आरोपींकडून ३३ लाख ७६ हजार किंमतीचे १७० ग्रॅम वजनाचा एमडी, १५ लाख ५२ हजार रोख रक्कम, एक चारचाकी व २६ मोबाईल असा एकूण ७१ लाख ८८ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सध्या अबेको व्होक्टरी ही नायजेरियन आरोपी महिला बोळींज पोलिसांच्या ताब्यात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

१७ मे पासून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. यात खरेदी विक्री करणाऱ्यांची मोठी साखळी असल्याचे दिसून आले आहे आतापर्यंत १२ आरोपींना आम्ही ताब्यात घेतले असल्याचे तपासअधिकारी पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी सांगितले आहे. याशिवाय पुढील तपास सुरुच आहे असेही त्यांनी सांगितले.