बुलढाणा : शासनाने यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे रब्बी अनुदान देण्यासाठी नागपूर आणि अमरावती विभागातील १० जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर केला आहे. या जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त २२ लाख ६२ हजार ४३४ हेक्टरसाठी २२६२ कोटी ४३ लाख रुपयांचे अनुदान वाटपाला मंजुरी देण्यात आली.

राज्य सरकारने १० ऑक्टोबर रोजी शासन आदेश काढत राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये अनुदान जाहीर केले होते.
त्यानंतर ३० ऑक्टोबरला राज्यातील पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र मधील जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना अनुदान वाटपाला मंजुरी देण्यात आली.
यापाठोपाठ आज (दि.०४) राज्य सरकारने नागपूर आणि अमरावती विभागातील १० जिल्ह्यांमधील २३ लाख ८३ हजार शेतकऱ्यांसाठी रब्बी अनुदान मंजूर केले. या शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त २२ लाख ६२ हजार ४३४ हेक्टरसाठी २२६२ कोटी ४३ लाख रुपयांचे अनुदान वाटपासाठी मंजुरी देण्यात आली.

अमरावती जिल्ह्यासाठी १८६. ९० कोटी, यवतमाळ जिल्ह्यासाठी ६३८ कोटी, बुलडाणा जिल्ह्यासाठी ६१० कोटी, अकोला जिल्ह्यासाठी ३२३ कोटी आणि वाशीम जिल्ह्यासाठी २७५ कोटींचे अनुदान वितरणास मान्यता देण्यात आली आहे. अमरावती विभागासाठी एकूण २०३४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्यासाठी ९२.८१ कोटी रुपये, भंडारा जिल्ह्यासाठी ९ कोटी मंजूर, गोंदीया जिल्ह्यासाठी अडीच कोटी, गडचिरोली जिल्ह्यात १३.२६ कोटी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ११० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नागपूर विभागसाठी एकूण २२७. ९१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुढील काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाईल.