जालना : भाजप हा चेटकिणीसारखा असून, तो काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांना खात आहे. भाजपने यापूर्वी काँग्रेसमुक्त राजकारणाची घोषणा केली होती. परंतु आता भाजपच काँग्रेसयुक्त झाला आहे. सध्याच्या राज्य मंत्रिमंडळात आठ-दहा जण पूर्वाश्रमीच्या काँग्रेसचे आहेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी येथे वार्ताहर बैठकीत सांगितले.

काँग्रेसचे स्थानिक माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर सपकाळ म्हणाले, ‘गेल्या चार महिन्यांत अनेकदा आमची भेट झाली. परंतु त्यांनी कधी नाराजी व्यक्त केली नव्हती. पक्षाने अनेकदा त्यांना उमेदवारी दिली. तरीही ते भाजपमध्ये जाणार असतील, तर हा पक्षाने त्यांना दिलेल्या संधींचा अवमान आहे. काँग्रेस हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, नेत्यांचा नाही. भीती आणि लालसेपोटी अनेक जण भाजपमध्ये जात आहेत. ‘गेल्या घरी सुखी राहा’ असेच आपण गोरंट्याल यांच्या संदर्भात म्हणू शकतो.’

‘काँग्रेस पक्ष फोडण्याची भाजपची भूमिका आहे. अन्य पक्षांतील कार्यकर्ते आपल्या पक्षात घेताना त्यांना लाज वाटली पाहिजे; परंतु सध्या त्यांनी ती गुंडाळून ठेवली आहे. अन्य पक्षांतील नेते घेतले नाहीत, तर आपला पक्ष टिकणार नाही याची भीती त्यांना वाटते. विधानसभेत पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा न घेणे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी नैतिकता गुंडाळून ठेवण्यासारखे आहे,’ असेही सपकाळ म्हणाले.

राज्यातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीची, तसेच नवीन कार्यकारिणीच्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पक्षात लवकरच मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख या वेळी उपस्थित होते. सपकाळ यांनी येथे परभणी, बीड आणि जालना जिल्ह्य़ांतील पदाधिकाऱ्यांकडून संघटनात्मक कामाचा आढावा घेतला.