छत्रपती संभाजीनगर : अतिवृष्टीच्या प्रश्नावर आक्रमक आहोत असा संदेश देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे ‘ हंबरडा मोर्चा’ त सहभागी होणार आहेत. या निमित्ताने विस्कळीत झालेल्या संघटनात्मक बांधणीला वेग देण्यासाठी गावोगावी बैठका घेण्याचा धडका शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सुरू ठेवला आहे. मात्र, शिवसेनेच्या उद्देशावरच आता भाजपकडून प्रश्नचिन्ह लावले जात आहेत. ठाकरे यांचे प्रेम पुतणा मावशीचे असल्याची टीका भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी केली.

अतिवृष्टीच्या मदतीबाबतचे सर्व निर्णय राज्य सरकारच्या पातळीवर घेतले जातील. विभागीय आयुक्तांच्या पातळीवर केवळ माहिती संकलित करुन किती मदत लागू शकते, याची माहिती राज्य सरकारला कळविले जाते. मग ‘ हंबरडा मोर्चा‘ विभागीय पातळीवर घेण्याचे प्रयोजन शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडविणुकीचा नाही, असा आरोप केला जात आहे. उद्धव ठाकरे हे स्वत: मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याने गावस्तरावर बैठकांचे सत्र सुरू करण्यात आले आहे. अंबादास दानवे यांनी गंगापूर, संभाजीनगर शहर तसेच विविध तालुक्यात जाऊन पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या मोर्चामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील संपर्क हाती घेण्यात आला आहे.

दरम्यान हा कार्यक्रम मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात होणार आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले या मोर्चात मराठवाड्यातील शिवसेनेचे प्रमूख नेते, आमदार , खासदार हे सहभागी होणार आहेत. गेल्या काही दिवसापासून मराठवाड्यावर मोठे संकट आले आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी ही मागणी पुढे रेटण्यासाठी ‘ आंदोलन’ करण्याची गरज होती. शेतकऱ्यांकडून ही मागणी जोरदारपणे पुढे येत आहे. विशेषत: कर्जमाफीचा विषय मराठवाड्यासाठी आवश्यक असल्याने या मोर्चाला अधिक गर्दी जमविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा मोठा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीच वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अद्यापि शासनाकडून कोणतीही मदत जाहीर झालेली नाही. त्यामुळे मराठवाड्यात विविध मागण्यांसाठी आंदोलने सुरू झाली आहेत. या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे गटाने संघटना बांधणीला वेग दिला आहे. गेल्या काही महिन्यात ठाकरे गटातून बाहेर पडणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. विशेषत: संभाजीनगर शहरात हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नव्या बांधणीच्या बैठका घेऊन अतिवृष्टीतील बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याबरोबर पक्षीय संघटनेला शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून चालना दिली जात आहे.