Uddhav Thackeray emotional speech: लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरची जागा वगळता इतर सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय झाला होता. छत्रपती संभाजीनगरचा पराभव हा शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. नुकतीच शिवसेनीच छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत ठाकरे यांनी जनतेला भावनिक आवाहन केले. “मोदी आणि शाह हे मला घरी बसवू शकत नाहीत. पण जेव्हा जनता ठरवेल, तेव्हा मी घरी बसेन”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे वाचा >> Vote Jihad: “एक ऐसा व्होट जिहाद…”, सज्जाद नोमानी यांच्या विधानाचा व्हिडीओ शेअर करत आशिष शेलारांची मविआवर टीका

छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचा औरंगाबाद) हा फार पूर्वीपासून शिवसेना पक्षाचा गड राहिला आहे. मात्र यावेळी लोकसभेत इथे शिवसेना (शिंदे) पक्षाचे संदीपान भुमरे यांचा विजय झाला. छत्रपती संभाजीनगर लोकसभेत जिल्ह्यातील पैठण, सिल्लोड, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम आणि वैजापूर हे पाच विधानसभा मतदारसंघ येतात. उद्धव ठाकरे यांनी याठिकाणी भावनिक आवाहन करून जनतेला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला आहे.

उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, “ही निवडणूक महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्र द्रोही यांच्यात होत आहे. लोकसभेत दुर्दैवाने आमचा पराभव झाला. तो कसा झाला आणि का झाला? याचे उत्तर कोण देणार? मविआच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात मी प्रामाणिकपणे केलेला कारभार तुम्हाला आवडला नाही का? माझे नेतृत्व तुम्हाला पसंत नाही का? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी विचारला. नसेल तर नाही सांगा. मला मोदी आणि शाह घरी नाही बसवू शकत. ज्यादिवशी तुम्ही मला सांगाल घरी बस त्यादिवशी क्षणार्धात घरी बसेन. पण जोपर्यंत तुम्ही मला लढण्यास सांगत आहात, तोपर्यंत माझ्या वाटेत कुणीही आले, प्राण गेले तरी बेहत्तर पण जिंकून दाखविल्याशिवाय राहणार नाही.”

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत संयुक्त शिवसेना आणि भाजपाने औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व नऊ जागांवर विजय प्राप्त केला होता. भाजपाने फुलंब्री (हरीभाऊ बागडे), गंगापूर (प्रशांत बंब) आणि औरंगाबाद पूर्व (अतुल सावे) यांनी विजय मिळविला होता. तर संयुक्त शिवसेनेने कन्नड (उदयसिंह राजपूत), सिल्लोड (अब्दुल सत्तार), औरंगाबाद मध्य (प्रदीप जैस्वाल), औरंगाबाद पश्चिम (संजय शिरसाट), पैठण (संदीपान भुमरे) आणि वैजापूर (रमेश बोरणाले) यांचा विजय झाला होता. उदयसिंह राजपूत वगळता इतर पाचही आमदारांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray makes emotional pitch to reclaim chhatrapati sambhajinagar will retire if you decide not to stand by me kvg