राजकारणात एका रात्रीत कोणतीही गोष्ट घडू शकत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी आणि काँग्रेसला राष्ट्रभर ओळख निर्माण करण्यासाठी जवळपास ३० वर्षांचा कालावधी लागला होता. जनसंघानंतर भाजपाला पहिला पंतप्रधान (अटलबिहारी वाजपेयी) होण्यासाठी अनेक दशकांची वाट पाहावी लागली. एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, आपल्या देशाची लोकसंख्या १३० कोटी एवढी आहे. एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यात बदल घडवू शकतो, असे १३० कोटी लोकांना समजायला निश्चितच वेळ जाईल, हे काम एका रात्रीत होणारे नाही. ज्या कुणाला हे काम करायचे असेल, त्यांना कमीतकमी १५ ते २० वर्षांचा वेळ द्यावा लागेल, अशी भूमिका निवडणूक रणनीतीकार आणि आता जनसुराज अभियानाच्या माध्यमातून नवा राजकीय विचार मांडणारे प्रशांत किशोर यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस अड्डा’मध्ये बोलताना मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या वर्तमान राजकारणात जर एखाद्या नेत्याचा उदय व्हायचा असेल तर त्याला दिवसाचे १२ तास काम करावे लागेल आणि त्याच्या हातात कमीतकमी १० वर्षांचा आराखडा असायला हवा, तरच तो पर्याय उभा करू शकतो, असेही प्रशांत किशोर म्हणाले. “मी काँग्रेसलाही हाच सल्ला दिला होता. तुमच्याकडे १०० हून अधिक वर्षांचा वारसा असेल, पण तुम्हाला पुन्हा नव्या अवतारात यावेच लागले. नव्या अवतारात आल्यानंतर कमीत कमी १० वर्षांचा काळ द्यावा लागेल, त्याशिवाय बदल घडवणे शक्य होणार नाही”, असे मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले.

Video: नरेंद्र मोदींचा वारसदार कोण? प्रशांत किशोर यांचं सूचक विधान; म्हणाले, “जो कुणी असेल, तो…!”

विरोधक डे ट्रेडिंग करतायत

भारतातील विरोधक सध्या चुकीच्या वाटेवर असल्याचे सांगत त्यांनी एक मजेशीर उदाहरण दिले. ते म्हणाले, “भारतातील विरोधक आणि त्यांची धोरणे ही शेअर बाजारात ‘डे ट्रेडिंग’ करणाऱ्या गुंतवणूकदारासारखी आहेत. शेअर बाजारात रोजच्या रोज पैसे गुंतवून चांगले पैसे कमवू, असा या गुंतवणूकदारांचा हेतू असतो. पण इतिहास सांगतो की, डे ट्रेडिंगमध्ये कुणीही फारसे पैसे कमवत नाही. जे लोक समभाग विकत घेऊन १० किंवा २० वर्ष वाट पाहतात, तेच चांगले पैसे कमवतात. त्यामुळे राजकीय पक्षांनीही डे ट्रेडिंगच्या भानगडीत न पडता त्यांची विचारधारा आणि संघटनेवर अधिक लक्ष देऊन त्याची बांधणी करायला हवी. रोज नवी नवी धोरणे घेऊन यश मिळणार नाही.” हा मुद्दा सांगताना प्रशांत किशोर पुढे म्हणाले, आज तुम्ही स्वबळावर लढत आहात, उद्या तुम्हाला इंडिया आघाडी बनवायची आहे. त्यानंतर तुम्ही राफेलचा मुद्दा घ्याल. तिसऱ्या दिवशी तुम्ही हिंदू व्हाल, अशी धरसोड वृत्ती तुम्हाला (विरोधकांना) यश देऊ शकणार नाही.

“१० वर्षांत ३ वेळा भाजपा बॅकफूटवर होती, पण काँग्रेसनं तिन्ही संधी गमावल्या”, प्रशांत किशोर यांनी मांडलं गणित!

प्रशांत किशोर यांनी शेअर बाजाराशी निगडित उदाहरण दिल्यानंतर ‘इंडियन एक्स्प्रेस ग्रुप’चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनंत गोएंका यांनी रॅपिड फायर प्रश्नावलीमध्ये हाच धागा पकडून प्रश्न विचारला की, प्रशांत किशोर जर गुंतवणूकदार असतील तर विरोधकांमधील कोणत्या दहा समभागावर ते गुंतवणूक करतील. “अखिलेश यादव, आदित्य ठाकरे, चिराग पासवान, केटीआर, उदयनिधी स्टॅलिन, जगन मोहन रेड्डी, राघव चड्ढा, ओमर अब्दुल्ला आणि अभिषेक बॅनर्जी”, अशी दहा नावे देऊन यापैकी कोणत्या पाच जणांची निवड कराल, असा प्रश्न गोएंका यांनी विचारला.

प्रशांत किशोर यांनी या प्रश्नांवर त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, ही सर्व नावे कुंडीत वाढलेली रोपं (पॉटेड प्लँट्स) आहेत. पुढे चालून हे समभाग मल्टीबॅगर होतील, असे सांगून तुम्ही मला १० वाईट समभाग निवडायला सांगत आहात. पण, मी यापैकी एकही निवडणार नाही. यानंतर अनंत गोएंका यांनी पुन्हा हाच प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारला. या दहा नावांपैकी कुणीही आश्वासक नसेल तर तुमच्या मनात असलेली नावे सांगा. यावर प्रशांत किशोर म्हणाले की, माझ्या नजरेसमोर सध्या एकही आश्वासक नाव दिसत नाही.

Video: भाजपाच्या हिंदुत्वाला काँग्रेस हरवू शकते का? प्रशांत किशोरांनी आकडेवारीच मांडली; म्हणाले, “३८ टक्के नाही…!”

यापुढे जाऊन प्रशांत किशोर यांनी त्यांचा मुद्दा आणखी विस्तृतपणे समजावून सांगितला. मी दक्षिण आफ्रिकेत काम करत असताना बिल गेट्स यांचे एक व्याख्यान ठेवण्यात आले होते. त्यात त्यांना विचारण्यात आले की, कोणता व्यक्ती तुमच्याहून अधिक श्रीमंत होऊ शकतो? यावर बिल गेट्स म्हणाले, कोण होईल हे मला माहीत नाही. पण, जो व्यक्ती माझी जागा घेईल तो नक्कीच माझ्या व्यवसायातील नसेल. कारण तो माझ्या व्यवसायातला असेल तर मी त्याला कसा पुढे जाऊ देईन? या उदाहरणावरून प्रशांत किशोर म्हणाले की, प्रस्थापित नेत्यांची जागा नक्कीच नवे आणि सध्याच्या राजकीय क्षितीजावर नसलेले लोकच घेतील. तुम्ही जुन्याच लोकांना पुन्हा पुन्हा लोकांच्या माथी मारू शकत नाहीत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant kishor speaks on new generation political leaders says they are not multibagger stocks kvg
First published on: 06-02-2024 at 19:46 IST