अवघ्या तीन महिन्यांवर २०२४ च्या लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. देशातील सर्वच पक्षांनी या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीनं नितीश कुमार यांच्या रुपाने बसलेला धक्का पचवून पुन्हा तयारीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे भाजपाकडून पूर्ण बहुमतचा विजय मिळण्याचे दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या १० वर्षांत विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षासमोर निष्प्रभ ठरल्याचं बोललं जात आहे. मात्र, ही खरी परिस्थिती नसल्याचं विश्लेषण राजकीय रणनीतीकार प्रशांत भूषण यांनी केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या अड्डामध्ये ते बोलत होते.

“विरोधकांना कमी लेखू नका”

प्रशांत किशोर यांनी भारतात विरोधक कमकुवत असल्याचा दावा फेटाळून लावला. “विरोधक नेहमी संघर्ष करत राहणार नाहीत. भारतात विरोधकांना कधीच कमी लेखू नका. आपल्यापैकी अनेकजण विचार करतात की विरोधक कमकुवत झाले आहेत आणि मोदी एकहाती सत्ता मिळवत आहेत. पण हे खरं नाहीये”, असा ठाम विश्वास प्रशांत किशोर यांनी यावेळी व्यक्त केला.

Amit Shah on ajit pawar
भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? अमित शाह म्हणाले, “आम्ही आमचं काम…”
Akhilesh Mishra
आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रांना पदावरुन हटवा; काँग्रेसने का घेतली आक्रमक भूमिका?
congress chief jitu patwari on bjp
“भाजपा काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास देत आहे, म्हणून…”, काँग्रेस खासदाराचा भाजपावर गंभीर आरोप
rahul gandhi bharat jodo nyay yatra will end with rally at shivaji park in mumbai
“भाजपाचं सरकार गेलं की बघून घेऊ”, १७०० कोटींच्या नोटीशीनंतर राहुल गांधींचा सीबीआय, ईडीला इशारा

दरम्यान, यावेळी प्रशांत किशोर यांनी काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी भाजपाला नमवण्याच्या तीन मोठ्या संधी वाया घालवल्याचा उल्लेख केला. २०१४ साली केंद्रात भाजपाची सत्ता आल्यापासून तीन वेळा मोठ्या काळासाठी भाजपा बॅकफूटवर असतानाही विरोधकांनी त्यावर कोणतीही खेळी न करता भाजपाला थेट पुनरागमन करण्याची संधी दिली, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला. यावेळी त्यांनी विरोधकांनी दवडलेल्या तीन संधी सविस्तर सांगितल्या.

पहिली संधी…

२०१४ च्या निवडणुकांनंतर लगेचच २०१५ मध्ये विरोधकांना चांगली संधी चालून आल्याचं प्रशांत किशोर यावेळी म्हणाले. “तुम्ही गेल्या १० वर्षांतल्या तीन घटना पाहा, जिथे विरोधकांना खरंच अशी संधी होती ज्यात ते मोदींना व भाजपाला बॅकफूटवर ढकलू शकले असते. पहिली संधी आली २०१५ मध्ये. मोदी सरकार नवीन होतं. अद्याप स्थिरस्थावर झालेलं नव्हतं. त्यांच्या खात्यात अद्याप कोणतंच भरीव यश आलेलं नव्हतं. भाजपानं जानेवारी २०१५ साली दिल्ली निवडणुकांचा सामना केला. तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. आपनं ७० पैकी ६७ जागा जिंकल्या. त्यानंतर नोव्हेंबर २०१५ मध्ये विरोधकांची मोदींविरोधातली पहिली आघाडी उभी राहिली. बिहार निवडणुकीत या आघाडीला यश मिळालं. भाजपाचा बिहारमध्ये पराभव झाला. बिहारनंतर पुढच्या चार महिन्यांत भाजपानं पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि इतर निवडणुका गमावल्या. पण आसामनं त्यांना वाचवलं. आसामनं त्यांना पुनरागमन करण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांनी बिहारमध्ये विजय मिळवला”, असं प्रशांत किशोर म्हणाले.

“नोव्हेंबर २०१५ मध्ये विरोधकांना आक्रमक होण्याची संधी होती. पण तेव्हा विरोधक निवांत होते. मोदी आत्ताच आलेत, लवकरच त्यांची प्रसिद्धी कमी होईल आणि आपले दिवस पुन्हा येतील, अशा आविर्भावात तेव्हा विरोधक होते. ती पहिली संधी विरोधकांनी गमावली. जानेवारी २०१४ ते मे २०१५ या १५ महिन्यांच्या काळात भाजपाला आसाम वगळता कोणताही विजय मिळाला नाही. तिथेही काँग्रेसच्या चुका जास्त होत्या”, असं प्रशांत किशोर म्हणाले.

दुसरी संधी…

“दुसरी संधी आली नोटबंदीनंतर. त्यातून देशभरात आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्याचं प्रतिबिंब २०१७-१८मध्ये दिसून आलं. गुजरातमध्ये सामाजिक वातावरण ढवळून निघालं. पटेल आंदोलनाची व्यापक चर्चा झाली. त्यामुळे कमकुवत झालेल्या काँग्रेसनं जवळजवळ भाजपाला पराभूत केलं. भाजपाचा कर्नाटकमध्ये पराभव झाला. त्यापाठोपाठ राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्येही भाजपाचा पराभव झाला. या काळात अर्थव्यवस्था संकटात होती, ग्रामीण भागात असंतोष होता, शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता. पाच राज्यांमध्ये भाजपाचा पराभव झाला. पण काँग्रेसनं पुन्हा मोठ्या चुका केल्या”, असं प्रशांत किशोर म्हणाले.

काँग्रेसच्या चुका..

“२०१७मध्ये पुढच्या चार महिन्यांत नितीश कुमार आणि शिवसेना या दोन महत्त्वाच्या मित्रपक्षांना सोबत घेण्यात काँग्रेसला अपयश आलं. त्या काळात हे दोन्ही मित्रपक्ष जवळजवळ काँग्रेसकडे वळण्याच्या मनस्थितीत होते. या काळात काँग्रेसनं २०१९मध्ये बसपा-सपा आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला. तसं केलं असतं तर त्यांच्या किमान १५-२० जागा तरी वाढल्या असत्या. त्यांना वाटलं की ‘चौकीदार चोर है’ला यश मिळेल, राफेल हे पुढचं बोफोर्स होईल. पण इथे त्यांनी दुसरी संधी गमावली. यावेळीही २०१७च्या मध्यापासून २०१८ च्या शेवटपर्यंतच्या १५ महिन्यांचा काळ काँग्रेसकडे होता”, अशा शब्दांत प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या चुकांचा पाढा वाचला.

भाजपानं नितीश कुमार यांना सोबत घेण्यामागचं नेमकं कारण काय? प्रशांत किशोर यांनी मांडलं गणित; म्हणाले…

काँग्रेसनं गमावलेली तिसरी संधी…करोना!

दरम्यान, करोना काळात काँग्रेसनं भाजपाविरोधात आघाडी घेण्याची तिसरी संधी गमावली, असं प्रशांत किशोर म्हणाले. “तिसरी संधी काँग्रेसला मिळाली बंगाल निवडणुकीनंतर २०२१मध्ये. करोनामुळे सगळीकडे चिंतेचं वातावरण होतं. भाजपाचा बंगालमध्ये पराभव झाला. तेव्हाच दुसरी लाट भारतात येत होती. त्यावेळी २० टक्क्यांनी मोदींची प्रसिद्धी खाली घसरली. पण तेव्हाही विरोधकांनी काहीच केलं नाही”, असं ते म्हणाले.

“क्रिकेटमध्ये तुम्हाला अर्ध्या संधीचंही सोनं करावं लागलं. पण इथे विरोधकांना तीन वेळा १५ महिन्यांचा असा काळ मिळाला जेव्हा भाजपा बॅकफूटवर होती. त्यांच्याकडे कोणतीही संधी नव्हती. पण तुम्ही त्यांना सरळ पुनरागमन करण्याची संधी दिली. जसं क्रिकेटमध्ये आपण म्हणतो की तुम्ही जर चांगल्या बॅट्समनचे तीन कॅच सोडले, तर त्याची किंमत तुम्हाला चुकवावीच लागणार. तेच इथे घडलं”, असं ते म्हणाले.